Sunday, November 25, 2007

माझ्या शौर्याच्या (??) सुरस कथा!!!!

१० नोव्हेंबर २००७

तशी काही मी शूर या सदरात मोडत नाही किंबहुना घाबरटच म्हणायला हवे. इतकी फ़िरले गेल्या एक-दिड वर्षात...माझ्या या सगळ्या प्रवासात अंधाराची भिती वाटते(आणि एकटेपणाची सुद्धा!!)...म्हणून माझ्या रुम मधले दिवे मी कधी बंद करत नाही....झोपतानासुद्धा...जास्त भिती वाटली तर टि.व्ही., रेडिओ हे पण रात्री झोपताना चालू ठेवते. आणि असे कधीतरी एकटे असताना नेमके नको ते प्रसंग आठवतात म्हणुन मी कधीही भुताखेताचे पिक्चर बघत नाही किंवा पुस्तके पण वाचत नाही...

मला प्रवास करणं ( तो पण विमानाने...आणि कंपनीच्या खर्चाने!!!) आवडायला लागलं आहे वाटतं. एक-दिड महिना होईल आता मी मागच्या वेळी सिंगापूर ला गेले होते त्याला....आणि मी परत ते सगळं मिस् करायला लागले आहे...ते विमानतळावरचे तास....ना इकडच्या जगात...ना तिकडच्या जगात...मध्येच कुठेतरी अधांतरी लोंबकळत असल्यासारखं...मला ते आवडायला लागलंय!!

या वेळी US हून परत येताना...सांता बार्बरा मधल्या अपार्टमेंट मधून निघून पुण्यात घरी पोचण्यासाठीच्या ४६ तास प्रवासात मी एकटीच होते. पण मी अगदी निवांत होते...फ़्लाइट मध्ये समोर आलेले सगळे खाणे पिणे व्यवस्थित केलं....काही तास झोपले...उरलेल्या वेळात फ़्लाइटमध्ये चालू असलेले सगळे हिन्दी, इंग्लिश पिक्चर बघून टाकले....हॉंगकॉंग एअरपोर्टवर ८ तासाच्या हाल्ट्मध्ये बराचसा एअरपोर्ट बघितला....मस्त विन्डो शॉपिंग केले.....एकूण काय....एकटी असताना पण प्रवास मस्त एंन्जॉय केला.

हेच पहिल्यांदा सिंगापूर ला जाताना मी प्रथमच एकटी प्रवास करत होते..म्हणजे प्रवास बराच केला होता तरी त्या आधीच्या सगळ्या प्रवासात माझ्यापेक्षा माहितगार कोणीतरी माझ्याबरोबर नेहमी होतं...सिंगापूर ला जाताना मात्र पुण्याहून पहाटे मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी मी जी निघणार होते...ते दुस-या दिवशी सकाळी सिंगापूर मध्ये हॉटेल लॉबीत ऑफिसमधले बाकीचे लोक भेटेपर्यंत मी एकटीच असणार होते.


आधी तर कामाच्या घाईत या गोष्टीवर विचार करायला वेळच मिळाला नव्हता. मुंबई एअरपोर्टवर माझा एक मित्र भेटायला येणार होता...त्याला मधूनच मी कुठपर्यंत पोचलेय हे कळवायला फोन करत होते त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवासात पण फारसं काही वाटलं नाही.एअरपोर्टवर मित्र भेटला..१०-१५ मिनिटे गप्पा झाल्यावर तो जेव्हा म्हटला..."चल गं..आता मी निघतो"......फट्कन साक्षात्कार झाला....अरेच्चा....आता इथून पुढे आपण अगदी पूर्ण एकटेच की!!! मित्राला म्हटलं..."खरं सांगू???....खूप भिती वाटायला लागलीये!!!"..तो खूप हसला...मला म्हटला..एवढी हुषार मुलगी आहेस...देवाने तोंड दिलेय......जिथे काही अडेल...तुला फ़क्त तोंड उघडून प्रश्न विचारायचे आहेत...आणि ते तुला आरामात जमेल...सगळं काही व्यवस्थित होईल...तेव्हा खरेतर त्याचा राग आला.......च्या मारी..मला भिती वाटतेय...आणि हा गधडा हसतो काय???..शेवटी त्याने विचारले "जाऊ का?"...त्याला जा सांगितलं..तसंही तो कितीही वेळ थांबला असता..तरी काय फरक पडणार होता?..तसंपण मला इतकी भिती का वाटतेय हे त्याला कळंत नव्हतं... तो गेला..आणि...प्रचंड टेन्शन येऊन माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं..आणि...रडायचं वगैरे नसताना डोळ्यात आपसूक पाणी यायला लागलंय....यामुळे मला माझाच संताप आला.

तडक रेस्टरूम गाठले...पहिले चेह-यावर पाणी मारलं....जरा अवतार ठीक केला....for god's sake....I should not look like a "radaki" girl...for such stupid reasons!!!.....बाहेर आले...पाणी प्यायले...आणि शांत बसले दोन मिनिट...मग डोकं थोडं चाललं....मुंबईत पण माझा फोन रोमिंगवर चालू होता..आणि मला किती आणि का भिती वाटते हे पक्कं माहित असलेल्या एका व्यक्तीशी तर मी नक्कीच बोलू शकणार होते.माझी बहिणाबाई!!!!!....मला खूप चांगलं ओळखते.मी न सांगता पण मला बरं वाटत नाहीये..किंवा भिती वाटतेय, काहीतरी बिनसलंय..हे तिला अचूक कळतं. माझ्या घाबरटपणा चा एक किस्सा तर तिने आख्ख्या खानदानाला सुनवलाय..


ही गोष्ट आहे मी तिसरीत असतानाची....आम्ही नुकतेच कोथरूड ला राहायला आलो होतो. जवळपासच्या दुकानात आम्ही दोघी मिळून थोड्याफार वेळेला गेलो होतो.तेव्हा अजूनपण मी काही काही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी...श्रीनिवासची एक पाटी वापरायचे. एक दिवशी संध्याकाळी घरातल्या पाटी वरच्या सगळ्या पेन्सिल संपल्या होत्या. दहा पैशाला एक पेन्सिल मिळायची. मी आईकडून वीस पैसे घेतले...आणि पाटीवरची पेन्सिल आणण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा आमचा रस्ता तसा कच्चा आणि बाजूलाच होता. रस्त्यावर भटके कुत्रे, डुकरे, शेळ्या मोकाट फिरत असायचे. मी आमच्या गेट मधून बाहेर पडले आणि कोप-यावरच्या पहिल्या दुकानाकडे निघाले. ब-यापैकी अंधार झाला होता. मी त्या दुकानापाशी पोचले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी गेट मधून बाहेर पडल्या पडल्या बाजूला उभी असलेली एक शेळी ( का बोकड होता?? शिंगे होती..त्याबरोबर कदाचित दाढी पण होती बहुतेक!) माझ्या बाजूनेच चालत चालत दुकानापर्यंत आली होती. मी पेन्सिल मागितली...तर नेमके त्याच्याकडच्या पेन्सिल्स संपल्या होत्या. मी दुस-या दुकानात जायचे म्हणून मागे वळले तर समोर ती शेळी!!!! तिने माझ्यावर शिंगे उगारली आहेत असं मला एकदम वाटलं आणि मी घाबरले. तरी पण आपलं लक्षच नाहीये असं दाखवत शेळीच्या डाव्या बाजूने जावे म्हणून मी थोडी डावीकडे वळले..तर शेळी पण तिकडेच वळली..मी उजवीकडे...शेळी पण उजवीकडे!!!.... तरी मी जोरात त्या दिशेने वळले..आणि रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेल्या एका दुकानाकडे जवळ जवळ पळत निघाले. पळता पळता मागे वळून बघितले तर...परत शेळी पण चालत त्याच दिशेने येताना दिसली. आता मात्र माझी खात्री झाली की ती शेळी माझा पाठलाग करत होती..आणि माझ्याजवळ पोचली की मला शिंगे मारणार होती. मी प्रचंड घाबरले आणि दुस-या दुकानाऎवजी घराच्या दिशेने जोरात जी पळत सुटले ते मागे न बघता...न थांबता थेट घरातच येऊन थांबले. पेन्सिल घेणे तर राहूनच गेले...आणि परत घरी पोचेपर्यंत मला रडू फुटले होते. पण आई..ताई..पप्पा कोणाला पण...शेळी पाठलाग करते ही गोष्ट पटलीच नाही...सगळे उलट मलाच हसले..आणि तेव्हा पासून ताई मला चिडवायचे झाले की माझ्यासमोर हा सगळा किस्सा नवनवीन लोकांना सांगत राहते. विक्रम..तिचा नवरा..आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना पण "निशा शेळीला घाबरते" हे तिने सांगून ठेवले आहे.

तर अशा माझ्या बहिणीला मग मी एअरपोर्टवरून फोन केला....जरी मी स्पष्ट काही सांगितले नाही तरी..घरून निघतानाचे...."काही काळजी करू नका..एकटी असले तरी मी नीट जाईन"...हे अवसान गेले होते...हे तिला समजले.तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. फ़्लाईट ११:३० ची होती. मग साधारण दर अर्ध्या तासाने...मी विमानात बसेपर्यंत ती मला फोन करत राहिली..आणि चहा घेतला का, कुठे बसली आहेस?...सामानाकडे लक्ष दे....असल्या फ़ुटकळ गप्पा मारत राहिली.मला का भिती वाटतेय हे निदान एका व्यक्तीला तरी समजल्यामुळे....आणि तसे पण....सिंगापूरपर्यंत विमानाने..आणि मग कॅब ने हॉटेलवर पोचेपर्यंत प्रवास नीट झल्याने मी सावरले झाले होते. हॉटेलच्या रूम वर पोचले...खाली जाऊन सिंगापूरच्या प्लग पॉइंट मध्ये लॅपटॉप चा चार्जर लावण्यासाठी कनव्हर्टर घेऊन आले. आणि पहिले घरी..आणि मग ताईला फोन करून मी नीट पोचल्याचे कळवले. ताईला फोनवर मी व्यवस्थित असल्याचे सांगितले..त्यावर ती हसून म्हटली..."शेळीला घाबरणारी मुलगी सिंगापूर ला एकटी गेली!!"

असो...एअरपोर्टवर माझ्या मित्राने दिलेला सल्ला खरेतर काही चुकीचा नव्हता...हे आता पटतंय..पण त्या वेळेला भिती वाटणं साहजिक आहे..हे त्याला समजलं नाही. आता मला परदेशप्रवासाचा भरपूर अनुभव आहे म्हणून ओळखीतले पहिल्यांदा प्रवास करणारे जेव्हा मला सल्ला विचारतात..तेव्हा मी माझ्या मित्राने मला सांगितलेली वाक्येच त्यांना ऐकवते.

पण...एका गोष्टीची मला कायम खात्री होती..आणि आहे...भले शिंगे मारण्यासाठी नसेल...माझ्याकडे तिला खाण्यायोग्य काहीतरी आहे असे वाटून असेल कदाचित...पण त्या शेळीने माझा पाठलाग केला होता हे नक्की!!!!!!

Wednesday, October 10, 2007

इक वो दिन भी थे.......इक ये दिन भी है......

२८ सप्टेंबर २००७

share trading सध्या एकदम जोरात सुरू आहे. मार्केट पण एकदम वर..... मी इतके दिवस विचार करायचे....आपण काय फारच कमी trading करतो. त्यातूनपण नफा मोजकाच!...मग हे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवायची गरज नाही...कुणाच्या लक्षात येणार आहे?....पण परवा कुणाशीतरी बोलताना एकदम ट्युब पेटली....बस का निशा....तू इतकी चमी कशी??.....अग बाळे...आपला पॅन नंबर दिलेला असतो ट्रेडींग अकाउंट उघडताना.....सरकार दरबारी जरी कितीही लाल फित कारभार असला...तरी दिवसेंदिवस ते पण technology wise पुढे चालले आहेत.....return e-filing व्हायला लागलेत....उद्या त्यांनी फ़क्त पडताळून पाहायचं ठरवलं तर माझी ही "तथाकथित लपवलेली" मिळकत trace होणे किती सोप्पं आहे!!! आणि मुख्य म्हणजे याबाबत आपण लपवालपवी करायला काही संधीच नाहीये.

काय करणार बापडी....म्हटलं चला निदान माझ्या शेअर बाजारातल्या छोट्याशा मिळकतीतला किती भाग त्यांच्या घशात जाणार आहे ते तरी मोजून बघू! trading acccount उघडलं...सगळया transactions चा रिपोर्ट काढला. पण short term आणि long term capital gain calculate करणं पटकन जमेना. आणि मग मला आठवलं काही वर्षापुर्वी मीच from scratch डेव्हलप केलेलं SimAcc!!!!!............hhhmmmm....जे मला आत्ता बघायचं आहे बरोब्बर तोच रिपोर्ट मी SimAcc मध्ये बनवला होता आणि commerce ची अजिबात अक्कल नसलेल्या मला अकाउंट्स...शेअर.....बॅलन्स शीट...हे सगळं समजून मग त्याचं application मध्ये रुपांतर करताना डोक्याचा भुगा झाला होता. काश.........आत्ता मला शेअर मार्केट बद्दल माहित आहे...तेवढं तेव्हा माहीत असतं.....मी अजून कितीतरी चांगली बनवली असती सगळी system!!!

माझ्याकडे अशाच पडलेल्या पुर्वीच्या Sinewave च्या CD शोधायला सुरूवात केली, एक मिळेल तर शपथ!!! मग Sinewave च्या site वर गेले. मी एकेकाळी design केलेल्या site चे रंगरूप पूर्ण बदलले होते. चांगलं होतं..पण आतमध्ये कुठेतरी छोटसं वाईट वाटलं. बावळट पणा होता...मी सोडल्यानंतर काय गोष्टी कायम तशाच राहणार होत्या??...मी पुढे जातेय.....बदलतेय......तिकडे पण बदल होतच राहणार....."बदल ही एकच गोष्ट जगात कायम असते!"....योग्य वेळी प्रसिद्ध ओळ आठवली. तेव्हा कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं...कधीकाळी मीच Develop केलेलं product असं Download करुन वापरावं लागेल. अर्धा तास Download केलं...install केलं. तो चिरपरिचित Taxbase चा login screen ओपन झाला!!!!..... मी स्वत:च त्या स्क्रीनवर किती वेळेला काम केले होते!!! तिथून SimAcc...तो SimAcc Home चा स्क्रिन दिसला.......आणि काय वाटलं ते वर्णन करणं अशक्य आहे!!..कुंभ के मेले मे बिछडा हुआ...मेरा बच्चा अचानक मुझे मिल गया!!!!.......

माझ्या सारख्या माणसांच काही होऊ शकत नाही....निर्जीव वस्तूंच्या पण प्रेमात पडतात.....माझी खुर्ची....माझी जागा....मी बनवलेलं software...आणि सानिध्यात आलेली प्रत्येक गोष्ट...प्रत्येक गोष्टीशी स्वत:ला जोडते.(म्हणूनच माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा छाप असेल याची मी काळजी घेते..पन्नास एकसारख्या work-stations मधून माझं work-station कसं सहज वेगळं दिसतं हे माझ्या आजूबाजूला बसणा-यांना लगेच कळू शकतं!!).......आणि मग सोडून जायची वेळ आली की वाईट वाटतं....

Sinewave च्या बाबतीत वाटणारी attachment थोडी जास्त आहे. जेव्हा माझी खात्री होत चालली होती की IT field मध्ये आपलं काही होत नाही...२००१ साल....पुर्ण slack period......मोठ्या मोठ्या कंपन्या experienced लोकांना काढताहेत....तिथं आपल्या सारख्या फ़क्त science graduate....engineer पण नाही...अशा फ़्रेशरचा काय पाड लागणार??....आपण आपले कुठे तरी फॅकल्टी किंवा data entry operator म्हणून चिकटणार....आणि मग कुठल्या तरी मिडीऑकर माणसाशी लग्न करून त्याचा मिडीऑकर संसार सांभळणार....आणि अगदी समजा ग्रेट नवरा मिळलाच...तर त्याच्यापुढे आपली लायकी ती काय.......म्हणून सगळं आयुष्य inferiority complex मध्ये घालवणार!!! अशा मनस्थिती मध्ये NIIT तून development interview चा शेवटचा चान्स म्हणून sinewave ला गेले...आणि जंगल मे मंगल हो गया.......sinewave मे हम पहले ४ दिन QA...और फ़िर डेव्हलपर हो गये!

तीन वर्षे तिथं अगदी वेड्यासारखं काम केलंय....किती वेळेला मला एखाद्या प्रोब्लेम चे solution झोपेतून मध्येच जाग आल्यावर किंवा ब्रश नाहीतर आंघोळ करता करता एकदम सुचायचं...आणि ऑफ़िस ला जाऊन ते try out करून बघितल्या शिवाय मग चैन पडत नसे. customer support माझा पहिला प्रोजेक्ट...आणि sinewave चं in-house software....दररोज ऑफ़िसमध्ये निदान १०-१२ कॉम्प्युटर्स वर ते चालू असलेलं बघून आणि आपण बनवलेल्या product लोकांना अवलंबून असलेलं पाहून इतकं समाधान वाटायचं ना......

yardi चं ऑफर लेटर हातात मिळाल्यावर मी ज्या दिवशी sinewave मध्ये resign केले होतं...रात्री घरी येऊन रडले होते....रडताना पण एकीकडे कळत होतं.....हे विनोदी आहे.....नवीन चांगला job मिळाला आहे....आपल्याला आनंद पण झालाय...आणि एकीकडे रडतोय.....उद्या जाम हसू येईल स्वत:लाच अशा पोरकटपणा वर....आणि आता ते तसं येतं ही!!! पण नवीन job चा आनंद जितका खरा होता...तितकेच त्या वेळी डोळ्यात आलेले अश्रू पण.....ते फ़क्त त्या क्षणासाठी होते....आणि त्या क्षणापुरते १०० टक्के खरे सुद्धा!

जशी sinewave साठी मनात खास जागा आहे....तशीच yardi साठी पण....sinewave माझ्या स्वप्नांपर्यंत जाण्याची पायवाट दाखवली असेल तर....yardi ने त्या पायवाटेचा express highway केला. भविष्यात कधी तरी...जेव्हा कदाचित yardi ला पण निरोप द्यायची वेळ येईल...तेव्हा पण मी रडणार आहे...मला माहितीये....आणि मग काही वर्षांनी त्या रडण्यावर हसेन पण!!.....express highway वर पुढे जाताना कदाचित पुढे पण काही चांगले विसावे भेटतील....पण Sinewave आणि Yardi...कायमच special राहतील.

असो....तरीही कुंभमेळ्यात सापडलेल्या "मेरा बच्चा" ची संगत थोड्याच दिवसाची आहे. ३० दिवसांचं trial license संपेल.(आणि १०,००० च्या नफ़्याचा हिशोब ठेवण्यासाठी मी ६,००० चं license विकत नक्कीच घेणार नाहीये!!)..आणि मग तो मला login screen च्या पुढे जाऊ देणार नाही. बहुतांशी डेव्हलपर्स सारखं मी माझ्या स्वत:साठी मागचे बरेच दरवाजे उघडे ठेवले होते....अगदी license चेक bypass करण्यासाठी पण मार्ग तयार केले होते. पण शेवट च्या काही महिन्यांमध्ये अपघाताने कोणाला तरी त्या चोरट्या मार्गांचा शोध लागेल आणि ते फ़ार भयानक ठरू शकेल....म्हणून मीच सगळे बंद केले.परत ते चोर दरवाजे उघडण्याच्या किल्ल्या काळाच्या ओघात माझ्या आठवणीतून पुसट झाल्या आहेत..त्यामुळे बंद दरवाज्याकडे बघून परत फ़िरण्याशिवाय मी दुसरं आता काही करू शकणार नाही................