Friday, January 15, 2010

शेणाचे घर...मेणाचे घर.......

परवा अशीच कामवाल्या बाईशी बोलत होते, काहीतरी उशीर होण्यावरुन विषय निघाला आणि तिने कारण सांगितले की आदल्या दिवशी तिच्या मुलीची शाळेची ट्रिप गेली होती..मग एकूणच तिच्या सगळ्याच मुलांबद्दल ती सांगत होती....खर्च जास्त होता तरी मुलीची इच्छा होती ट्रिपला जाण्याची म्हणून तिने कसे पैसे जमवले...सकाळी उठून डबा करुन दिला.. दुसरी दहावीला आहे, तिला हवे असलेले क्लासेस लावताना पैश्याची कितीही ओढाताण झाली तरी ते ती करते....ते करणे कसे आवश्यक आहे वगैरे..वगैरे...
दोघी मुलींबद्दल ती इतके भरभरुन बोलत होती की मला आश्चर्य वाटले. कारण त्या बाईला इतके बोलताना मी कधी पाहिले नव्हते..कायम कामापुरते बोलणे..शांत पणे आपले काम करुन निघून जाणे....या मुळे मला ती बाई बरी वाटते ( हो ना... गॉसिप सेन्टर नसलेली कामवाली मिळणे अवघडच!)

मग नंतर विचार करत होते....तेव्हा जाणवले....तिचे सगळे आयुष्य..सगळ्या आशा आकांक्षा तिच्या दोन (कि तीन?) मुलींभोवतीच गुरफटलेल्या होत्या.... तिच्या आयुष्यात केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही फक्त त्यांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण/कपडे/आयुष्य देण्यासाठीच होती.

मग मला हे ही जाणवले.......की थोडया फार फरकाने आपल्या भोवतालीची सगळीच माणसे अशीच आहेत की! कशा ना कश्यात तरी आपला जीव गुंतवून बसलेली..त्यांची अवस्था ही त्या परिकथेतल्या राक्षसासारखी असते.... शरीर एकीकडे....आणि प्राण मात्र बाहेरच्या दुस-याच कुठल्या गोष्टीत..पोपट काय...किंवा संदूक काय....

मग त्य शरीराबाहेरचा जीव अवतिभोवतीची माणसेच असतात...कधी मुले कधी आयुष्याचा जोडीदार...कधी अजून कुणीतरी..... अगदी मनाच्या जवळ आणि प्रिय....

आणि ही सगळी लोकं मला इतके निर्धास्तपणे सगळा जीव आपल्या आपल्या पोपटात किंवा संदुकीत सुरक्षित आहे असे समजून वागताना दिसतात की जणू काही सगळे काही छानच होणार आहे.... कितीही वादळी पाऊस होऊ देत.... त्यांचे स्वप्नांचे घर चिऊताई सारखा मेणाचंच असणार आहे...सहजपणे वाहून जाणा-या काऊच्या शेणाच्या घराप्रमाणे त्यांच्या स्वप्नांचे इमले मुळीच वाहून जाणार नाहीयेत...

पण खरच किती लोकांची घरे मेणाची ठरतात?

इतक्यात मी माझ्या आजूबाजूला इतकी स्वप्नं उधळली गेलेली पाहिली आहेत की विचारु नका....हातातोंडाशी आलेला मुलगा/मुलगी किरकोळ आजारात गेले...... जन्मोजन्मी हाच मिळावा असा वाटायला लावणारा जोडीदार अपघातात गेला.....

दररोज पेपर उघडावा.....तर अशाच बातम्या दिसत असतात....स्वत:ची काही चूक नसताना अपघातात दगावलेले लोक.... क्षुल्लक कारणाने निराशेत आत्महत्या करणारी मुले....

मी त्या गेलेल्या लोकांपेक्षा...ते ज्यांचा जीव होते...त्या मागे राहिलेल्या लोकांबद्दल विचार करत राहते...... अस सगळं उधळलं गेल्यावर ते कसे आणि केव्हा सावरतील? नक्की पुर्णपणे सावरतील की एक कायमचा व्रण, पोकळी आयुष्यात घेऊन उरलेले आयुष्य रेटत राहतील?

मग लोकांचा विचार करता करता फिरुन गाडी स्वत:वर पण येते.....माझा (हो...या राक्षसिणीचा!!) जीव कुठे कुठे अडकलाय? निदान २-४ तरी पोपट अन संदुका आहेतच!!! आणि सगळे तितकेच आवश्यक....लग्न झाल्यानंतर आता अजून एक पोपट वाढलाय!!! :)

झाला असं की.... माझ्या मैत्रिणीच्या नात्यात एक जण असाच अपघातात गेला अचानक.... २/३ वर्ष झालेली लग्नाला..एक वर्षाचा मुलगा..... जरी मी पाहिलेलं नसलं त्याच्या बायको ला ...तरी अशी बातमी मनात घर करून रहिली.

अन त्याला दोन चार दिवस झाले नसतील...नवरा बाहेर गेला होता.... सांगून गेलेली वेळ उलटून पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही (जे तो शक्यतो कधी करत नाही..उशीर होत असेल तर फोन करून कळवतो)......म्हणून मी फोन केला.... दोन चार वेळेला फोन उचलला नाही.... मला चिंता वाटायला लागली....थोडया वेळाने माझा missed कॉल पाहुन त्याने फोन केला...सांगितले की तो ट्रॅफिक मध्ये अडकलाय आणि १० मिनिटात पोचेल.... मग मी परत माझे उद्योग करता करता त्याची वाट बघायला लागले....१० ची जवळजवळ ३० मिनिटे झाली आणि दरवाज्याला किल्ली लावून साहेब स्वत:च घरात
आले..... "१० मिनिट सांगून अर्धा तास काय लावतोस रे"..असे मी म्हणेपर्यंत माझं लक्ष बाकीच्या गोष्टींकडे गेले... दोन्ही गुढगे, हात भरपूर खरचटून रक्ताळलेले होते.... पॅन्ट कुठेतरी अडकून थोडी फाटल्यासारखी दिसत होती... नंतर नीट बघितले तेव्हा पाठीला पण बराच मार बसला होता....

औषध लावता लावता मग त्याने सांगितले...एक कुत्रा मध्ये आला कुठुनतरी पळत रस्त्यात अचानक, त्याला धडकायला नको म्हणुन हयाने ब्रेक मारला तेव्हा मागचे दोन गाडीवाले जोरात येऊन त्याच्यावर धडकले वगैरे वगैरे....

ह्या दोन गोष्टीच्या लागोपाठ घडण्यामुळे असेल, नाहीतर मुळातला माझा घाबरट स्वभाव आहे म्हणुन ....पण सध्या माझ्या डोक्यात ही भीती कायम असते......माझ्या आयुष्यात महत्वाची असलेले कोणिही बाहेर गेले..वेळेत परत नाही आले....किंवा थोडे फार आजारी पडले की मी हायपर होते....या माझ्यामधल्या अचानक बदलाचे नव-याने कारण विचारले तेव्हा त्याला पण सांगितले, तर त्याने उडवून लावले....म्हटला"अपघात होत असतात म्हणून कोणी असे जगणे थांबवत नसते किंवा घाबरुन घाबरुन जगत नसते....तू नुकतीच जेव्हा गाडी शिकली होतीस...कॉलेजला घेऊन जायचीस तेव्हा तुझे आईवडिल काय असे ऊठ्सूठ चिंता करत होते का.... उगाच काहीतरी आपले..."..पटते मला तो जे म्हणतो ते, पण तरी वेळ आली की मनात परत शंका प्रवेश करतातच......

आणि असे आहे की...माझा जीव ज्यांच्यात आहे असे पोपट जाणा-या काळानुसार वाढतच जाणार आहेत...आज दोन चार लोक आहेत..... उदया मूल (किंवा मुले ;))... असेल....हे असे सदैव मन पोखरत राहणारे विचार नकोसे वाटतात.....

माझे आई-वडिल पण कधीतरी ह्याच मानसिक अवस्थेतून गेले असतील का?....असतील तर ते असे सदैव काळजी करत राहायचे का?....कि त्यांनी स्वत:च्या मनाची समजुत करून घेतली होती की त्यांचे घर मेणाचेच ठरेल? अन जरी केली असेल तरी ती करुन फारसे काही वाईट झाले असे नाहीये म्हणा....झालेच की बहुतेक सगळे नीट....

तुम्ही लाख सगळे सुरक्षित करायचा प्रयत्न कराल.....मेडिक्लेम घ्याल...इन्शुरन्स घ्याल.... पण इन्शुरन्स क्लेम कधीच वापरायची कुटुंबावर वेळ येऊ नये हीच इच्छाच असते. मेडिक्लेम पण दुर्धर आजारासाठी वापरण्याची वेळ येऊ नये अशीच मनोमन प्रार्थना असते...या इच्छा आणि प्रार्थना पूर्ण होणे किती प्रमाणात आपल्या हातात असते?

स्काय-डायविंग करताना ते १०-१५ क्षण जे काय घाबरले असेन ...त्या पेक्षा ही सारखी वाटणारी भीती जास्त त्रासदायक आहे.....ते बरे होते..... निदान जमिनीला पाय टेकल्यावर खात्री झाली की आता भीती संपली....नेहमीच्या आयुष्यात असे आहे की अखेरच्या श्वासापर्यंत हे नक्की होणारच नाहीये ना की आपलं घर शेणाचं ठरलं की मेणाचं.... ती दररोज नव्याने होणरी कसोटीच असणार आहे....त्यामुळे कुठल्याच दिवशी असे होणार नाही की तुम्ही निर्धास्त व्हाल की चला या पुढे सगळे नीटच होणार आहे.........

ते मात्र "भय इथले संपत नाही" च्याच चालीवर चालत राहतेय.........

Thursday, July 23, 2009

"माज"

एखाद्याला उगाच माज आहे एखाद्या गोष्टीचा असं वाटून किती वैतागतो आपण कधीतरी.....

माझ्या घराच्याजवळच एक सायकलचे दुकान होते."जयनाथ सायकल मार्ट". हवा भरणे, किरकोळ दुरुस्ती अशा प्रकारचे एक १५ बाय १५ जागेत थाटलेले जुनाट दुकान होते ते! दुकान तसे यथा तथाच पण बहुतेक त्या एरिया मध्ये तेव्हा असेलेले एकमेव सायकलचे दुकान असल्यामुळे चांगले चालायचे...
दुकानाचा मालक एक गतकाळीचा पहिलवान होता.....म्हणजे ते मला दुकानात लावलेल्या फोटोवरुन कळले होते. पहिलवान गल्ल्यावर बसण्यशिवाय आणि एखाद्या आलेल्या मित्राशी तास न तास गप्पा मारण्याशिवाय काहीच करायचा नाही. खरेतर त्याला स्वत:ला सायकल दुरुस्ती मधले...हवा भरणे सोडले तर काहीच कळत नसावे असा माझा अंदाज आहे.

त्या दुकानात एक नोकर कामाला होता....नाव माहीत नाही....पण विद्रुप आणि त्रासिक चेह-याचा तो माणूस होता.....जरी नोकर असला तरी मालकाला काहीच येत नसल्यामुळे मग तोच सगळ्या दुकानात एकमेव माहीतगार माणसाच्या तो-यात फिरायचा.....

तुम्ही सकाळी कितीही लवकर शाळेसाठी निघा....हा बाबाजी मालक असला किंवा नसला तरी एखादी सायकल दुरुस्त करत बसलेला किंवा पंक्चर काढत बसलेला दिसायचा. रात्री पण जवळ जवळ ८:३०-९:०० पर्यन्त तो असायचा.... दुपारी अर्धा तास जवळ कुठे तरी जेवायला जात असावा तेवढाच!
कायम तेच ठराविक कपडे.....शर्ट दुकानाच्या आतल्या खुन्टीवर टांगलेला, लाल-नारंगी रंगाचे मळके बनियन आनि ऑईल चे डाग पडून पडून काळपट झालेली पॅन्ट ह्याच ठरलेल्या पोशाखात मी त्याला वर्षानुवर्षे पाहात आले....

मी आठवीला असताना आमची पहिली सायकल घरात आली.....तशी मी मैत्रिणिंच्या सायकल वरुन धडपडत-धडपडत एक दोन वर्ष आधीच सायकल शिकले होते.

ताईला मात्र सायकल सुरुवातीला नीट येत नव्हती...त्यामुळे ताई साठी घेतलेली सायकल मीच जास्त फ़िरवायचे. मग दर दोन तीन दिवसांनी हवा भरणे, कधी ऑईलिंग यासाठी येण्या जाण्याच्या रस्त्यावर जयनाथच सोयिस्कर पडायचे.....

सायकल घेउन ३-४ महिने झाले होते....आणि दुचाकी प्रमाणे सायकलचे पण सर्विसिंग करुन घ्यावे, मग सायकल जास्त दिवस चांगली राहते..असे कोणितरी मला सांगितले होते........ मग एक दिवस त्याप्रमाणे मी जयनाथ मध्ये सर्विसिंगसाठी सायकल टाकून आले......संध्याकाळी सायकल आणायला गेले....माझी
सायकल तिथे पुर्ण खोलून ठेवलेली होती...तासाभरात सायकल मिळेल...आणि बिल १२५ रुपये झाले हे ऐकून मी दचकले.....

तो ९२-९३ च काळ होता....नवीन सायकल ११००-१२०० ला मिळायची....तेव्हा ३-४ महिन्यापुर्वी घेतलेल्या नवीन सायकलच्या सर्विसिंग साठी १२५ रुपये म्हणजे खूपच जास्त वाटले...हा माणूस आपल्याला फसवतो आहे असे वाटून मी घरी परत आले.....पप्पांना सांगितले....तेव्हा "आता पैसे द्यावे लागतील...त्याने तुझी सायकल आता पुर्ण खोलून ठेवली आहे..आणि पैसे दिल्याशिवाय काही तो परत ती पहिल्यासारखी जोडून देणार नाही.....मुळात तू कशाला नवीन सायकल सर्विसिंगला टाकायला गेलीस...आधीच किती पैसे होतील ते का नाही विचारले.." वगैरे वगैरे बोलणी खाल्ली.......

दोन-तीन दिवस आधी आमच्यापेक्षा थोडा मोठा असलेला माझा आत्येभाऊ आमच्याकडे राहायला आला होता...... मी त्याला सगळे सांगितले, तो पण अगदी तावातावात..."तो आपल्याला कसं फसवतोय....आत्ता जाऊन विचारू ना...१२५ रुपये कसले झाले.....अजिबात मिळणार नाही...." असे बोलला....मला कोणितरी
आपल्या बाजुने भांडायला आहे म्हणुन जरा धीर आला...... आम्ही दोघे लगेच परत त्या दुकानात यायला निघालो......

आलो...तर आमची सायकल जोडण्याचेच काम चालु होते....माझ भाऊ आवेशात...."कसले १२५ रूपये....कुठले एवढे पार्ट बदलले नविन सायकल मध्ये...उल्लु बनवतात का...आम्हाला पण कळतं"....वगैरे वगैरे बडबडायला लागला.... यावर त्या माणसाने तुच्छतेने माझ्या भावाकडे बघितले.....आणि मोठयाने बडबड करत एक बिल आणुन त्याला दिले...आणि बदललेला असे दाखवलेला प्रत्येक पार्ट बाजुला ठेवलेला दाखवला आणि तो पार्ट बदलणे का आवश्यक होते ते धाड्धाड सांगायला सुरुवात केली....आता मला आठवत नाही ती लिस्ट...पण लिस्ट आणि बदललेल्या आधीच्या पार्ट चा ढिग पाहिल्यावर माझा भाऊ निरुत्तर झाला....

शेवटी सगळे काम होईपर्यन्त थांबुन.......आम्ही पैसे देउन सायकल घेउन निघालो.......सगळा वेळ तो माणुस तोंडातल्या तोंडात काहितरी "हल्लीची आगाऊ मुले" या सदरावर पुटपुटत होता...आणि आमच्या कडे "मला शिकवताहेत" असे तुच्छतादर्शक माजोरडे कटाक्ष टाकत होता.....

या सगळया प्रकारामुळे बहुतेक माझा चेहरा पण त्याच्या लक्षात रहिला....नंतर पण कित्येक दिवस मी हवा भरायला थांबले...की माझ्याकडे माजोरडा तुच्छतेचा कटाक्ष टाकायला तो विसरयचा नाही.......

नंतर हळूहळू मग त्याच्या मनातुन हे पुसट झाले असावे...त्याने बाकिच्या गि-हाईकांना देतात तशी कामात असल्यामुळे "खिजगणतीत नसलेली" वागणुक मला द्यायला सुरवात केली.... आणि मी हुश्य केले...

अशी कित्येक वर्षे गेली......माझी सायकल वरुन सनी..स्कूटी.... एम-८०...मग कार अशी वाटचाल होत राहिली........पण जायचा यायचा रस्ता तोच असल्यामुळे....कोप-यावर तो माणूस दिसत रहिला.....तेच लाल - नारंगी बनियन अन मळकी पॅन्ट....तोच त्रासिक चेहरा.........त्यामुळे त्याचे वय वाढलंय हे कधी फारसे जाणवले नाही.....जणु त्याच्या दुकानात काळ वर्षानुवर्षे तिथेच थांबला होता....

मग असेच दोन तीन वर्षापुर्वी अचानक मला दिसले...की जयनाथ सायकल मार्ट बंद होऊन तिथे "जयनाथ स्नॅक्स सेन्टर" सुरु झालेय......बहुदा तो पहिलवान गेला असावा अणि त्याच्या मुलाबाळांना सायकल दुकानापेक्षा वडापाव सेन्टर हा जास्त योग्य व्यवसाय वाटला असावा.....दुकानच्या बाहेरच्या जागेत बाकडयावर दोन माणसे गप्पा मारत बसली होती....

दुकानात झालेला बदल पाहिल्याचे आश्चर्य ओसरल्यानंतर माझी दॄष्टी दुकानाच्या ओसरीकडे वळली.........तिथे तोच नोकर बसला होता....... हवा भरण्याचा मॅन्युअल पम्प घेउन! इतक्या वर्षात पहिल्यांदा मी त्याला निवांत बसलेले बघितले...अन काहितरी दुसरा मोठा बदल होता.... चेह-यावरचा माज कुठे तरी हरवला होता......

त्याचे साम्राज्य...जिथे तो एकमेव राजा होता.......अचानक पणे संपले होते........पण वर्षानुवर्षे तेच काम, त्याच जागेत तो-यात केल्यावर...अता नव्या परिस्थितीमध्ये काय करावे हे त्याला बहुतेक कळत नव्हते....

कित्येक दिवस मी मग रोज येता-जाता त्याचे निरिक्षण करत होते.....कधी तरी हवा भरायला कोणितरी असायचे...कधि नसायचे तेव्हा बुडाखाली दगड घेऊन आणि गुडघ्यावर हाताची घडी घालून तो रस्त्याकडे बघत बसलेला असायचा.......

त्याच्या चेह-यावरचा तो राज्य हरून परागंदा झालेल्या राजासारखा बापुडवाणा भाव बघताना खूप कसेतरी वाटले.....आणि हळूहळू तो माणूसही म्हातारा झाल्याचा खुणा मला त्याच्या चेह-यावर दिसायला लागल्या.... विद्रुप असला तरी त्याचा चेहरा पुर्वी माजामुळे कदाचित वयापेक्षा तरुण दिसत असेल बहुतेक...

मग मी काही महिन्यांसाठी भारताबाहेर गेले....... मध्ये कित्येक दिवस माझे लक्ष पण नव्हते...आणि परत एक दिवस सहज माझे कोप-यावर लक्ष गेले....... स्नॅक्स सेन्टर फ़ारसे काही फायदेशीर ठरले नसावे...आणि त्या जागेत दुसरे काय करावे हे न सुचल्याने नवीन मालकाने बहुतेक अर्ध्या जागेत परत सायकलचेच दुकान सुरु केले होते....

तो नोकर परत उत्साहाने आणि लगबगीने सगळीकडे सायकल दुरुस्ती सामानाच्या ढिगा-यात बुडाला होता. त्याच्या नेहमीच्या त्रासिक चेह-यावर "राज्य" परत मिळाल्यामुळे पुर्वीचा रंग परत आला होता की मलाच असा भास होत होता कुणास ठाऊक!

माज करतो म्हणून त्रासदायक वाटतात माणसं..पण त्याच माजोरड्या माणसाला त्या नेहमीच्या मिजासीतून बाहेर आले कि वाटतं....नको.. ही माणसे स्वत:च्या माजात असतात तेव्हाच बरी दिसतात.....त्यांना केविलवाणे झालेले बघणे अजूनच कसेतरी वाटते....