Sunday, November 25, 2007

माझ्या शौर्याच्या (??) सुरस कथा!!!!

१० नोव्हेंबर २००७

तशी काही मी शूर या सदरात मोडत नाही किंबहुना घाबरटच म्हणायला हवे. इतकी फ़िरले गेल्या एक-दिड वर्षात...माझ्या या सगळ्या प्रवासात अंधाराची भिती वाटते(आणि एकटेपणाची सुद्धा!!)...म्हणून माझ्या रुम मधले दिवे मी कधी बंद करत नाही....झोपतानासुद्धा...जास्त भिती वाटली तर टि.व्ही., रेडिओ हे पण रात्री झोपताना चालू ठेवते. आणि असे कधीतरी एकटे असताना नेमके नको ते प्रसंग आठवतात म्हणुन मी कधीही भुताखेताचे पिक्चर बघत नाही किंवा पुस्तके पण वाचत नाही...

मला प्रवास करणं ( तो पण विमानाने...आणि कंपनीच्या खर्चाने!!!) आवडायला लागलं आहे वाटतं. एक-दिड महिना होईल आता मी मागच्या वेळी सिंगापूर ला गेले होते त्याला....आणि मी परत ते सगळं मिस् करायला लागले आहे...ते विमानतळावरचे तास....ना इकडच्या जगात...ना तिकडच्या जगात...मध्येच कुठेतरी अधांतरी लोंबकळत असल्यासारखं...मला ते आवडायला लागलंय!!

या वेळी US हून परत येताना...सांता बार्बरा मधल्या अपार्टमेंट मधून निघून पुण्यात घरी पोचण्यासाठीच्या ४६ तास प्रवासात मी एकटीच होते. पण मी अगदी निवांत होते...फ़्लाइट मध्ये समोर आलेले सगळे खाणे पिणे व्यवस्थित केलं....काही तास झोपले...उरलेल्या वेळात फ़्लाइटमध्ये चालू असलेले सगळे हिन्दी, इंग्लिश पिक्चर बघून टाकले....हॉंगकॉंग एअरपोर्टवर ८ तासाच्या हाल्ट्मध्ये बराचसा एअरपोर्ट बघितला....मस्त विन्डो शॉपिंग केले.....एकूण काय....एकटी असताना पण प्रवास मस्त एंन्जॉय केला.

हेच पहिल्यांदा सिंगापूर ला जाताना मी प्रथमच एकटी प्रवास करत होते..म्हणजे प्रवास बराच केला होता तरी त्या आधीच्या सगळ्या प्रवासात माझ्यापेक्षा माहितगार कोणीतरी माझ्याबरोबर नेहमी होतं...सिंगापूर ला जाताना मात्र पुण्याहून पहाटे मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी मी जी निघणार होते...ते दुस-या दिवशी सकाळी सिंगापूर मध्ये हॉटेल लॉबीत ऑफिसमधले बाकीचे लोक भेटेपर्यंत मी एकटीच असणार होते.


आधी तर कामाच्या घाईत या गोष्टीवर विचार करायला वेळच मिळाला नव्हता. मुंबई एअरपोर्टवर माझा एक मित्र भेटायला येणार होता...त्याला मधूनच मी कुठपर्यंत पोचलेय हे कळवायला फोन करत होते त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवासात पण फारसं काही वाटलं नाही.एअरपोर्टवर मित्र भेटला..१०-१५ मिनिटे गप्पा झाल्यावर तो जेव्हा म्हटला..."चल गं..आता मी निघतो"......फट्कन साक्षात्कार झाला....अरेच्चा....आता इथून पुढे आपण अगदी पूर्ण एकटेच की!!! मित्राला म्हटलं..."खरं सांगू???....खूप भिती वाटायला लागलीये!!!"..तो खूप हसला...मला म्हटला..एवढी हुषार मुलगी आहेस...देवाने तोंड दिलेय......जिथे काही अडेल...तुला फ़क्त तोंड उघडून प्रश्न विचारायचे आहेत...आणि ते तुला आरामात जमेल...सगळं काही व्यवस्थित होईल...तेव्हा खरेतर त्याचा राग आला.......च्या मारी..मला भिती वाटतेय...आणि हा गधडा हसतो काय???..शेवटी त्याने विचारले "जाऊ का?"...त्याला जा सांगितलं..तसंही तो कितीही वेळ थांबला असता..तरी काय फरक पडणार होता?..तसंपण मला इतकी भिती का वाटतेय हे त्याला कळंत नव्हतं... तो गेला..आणि...प्रचंड टेन्शन येऊन माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं..आणि...रडायचं वगैरे नसताना डोळ्यात आपसूक पाणी यायला लागलंय....यामुळे मला माझाच संताप आला.

तडक रेस्टरूम गाठले...पहिले चेह-यावर पाणी मारलं....जरा अवतार ठीक केला....for god's sake....I should not look like a "radaki" girl...for such stupid reasons!!!.....बाहेर आले...पाणी प्यायले...आणि शांत बसले दोन मिनिट...मग डोकं थोडं चाललं....मुंबईत पण माझा फोन रोमिंगवर चालू होता..आणि मला किती आणि का भिती वाटते हे पक्कं माहित असलेल्या एका व्यक्तीशी तर मी नक्कीच बोलू शकणार होते.माझी बहिणाबाई!!!!!....मला खूप चांगलं ओळखते.मी न सांगता पण मला बरं वाटत नाहीये..किंवा भिती वाटतेय, काहीतरी बिनसलंय..हे तिला अचूक कळतं. माझ्या घाबरटपणा चा एक किस्सा तर तिने आख्ख्या खानदानाला सुनवलाय..


ही गोष्ट आहे मी तिसरीत असतानाची....आम्ही नुकतेच कोथरूड ला राहायला आलो होतो. जवळपासच्या दुकानात आम्ही दोघी मिळून थोड्याफार वेळेला गेलो होतो.तेव्हा अजूनपण मी काही काही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी...श्रीनिवासची एक पाटी वापरायचे. एक दिवशी संध्याकाळी घरातल्या पाटी वरच्या सगळ्या पेन्सिल संपल्या होत्या. दहा पैशाला एक पेन्सिल मिळायची. मी आईकडून वीस पैसे घेतले...आणि पाटीवरची पेन्सिल आणण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा आमचा रस्ता तसा कच्चा आणि बाजूलाच होता. रस्त्यावर भटके कुत्रे, डुकरे, शेळ्या मोकाट फिरत असायचे. मी आमच्या गेट मधून बाहेर पडले आणि कोप-यावरच्या पहिल्या दुकानाकडे निघाले. ब-यापैकी अंधार झाला होता. मी त्या दुकानापाशी पोचले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी गेट मधून बाहेर पडल्या पडल्या बाजूला उभी असलेली एक शेळी ( का बोकड होता?? शिंगे होती..त्याबरोबर कदाचित दाढी पण होती बहुतेक!) माझ्या बाजूनेच चालत चालत दुकानापर्यंत आली होती. मी पेन्सिल मागितली...तर नेमके त्याच्याकडच्या पेन्सिल्स संपल्या होत्या. मी दुस-या दुकानात जायचे म्हणून मागे वळले तर समोर ती शेळी!!!! तिने माझ्यावर शिंगे उगारली आहेत असं मला एकदम वाटलं आणि मी घाबरले. तरी पण आपलं लक्षच नाहीये असं दाखवत शेळीच्या डाव्या बाजूने जावे म्हणून मी थोडी डावीकडे वळले..तर शेळी पण तिकडेच वळली..मी उजवीकडे...शेळी पण उजवीकडे!!!.... तरी मी जोरात त्या दिशेने वळले..आणि रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेल्या एका दुकानाकडे जवळ जवळ पळत निघाले. पळता पळता मागे वळून बघितले तर...परत शेळी पण चालत त्याच दिशेने येताना दिसली. आता मात्र माझी खात्री झाली की ती शेळी माझा पाठलाग करत होती..आणि माझ्याजवळ पोचली की मला शिंगे मारणार होती. मी प्रचंड घाबरले आणि दुस-या दुकानाऎवजी घराच्या दिशेने जोरात जी पळत सुटले ते मागे न बघता...न थांबता थेट घरातच येऊन थांबले. पेन्सिल घेणे तर राहूनच गेले...आणि परत घरी पोचेपर्यंत मला रडू फुटले होते. पण आई..ताई..पप्पा कोणाला पण...शेळी पाठलाग करते ही गोष्ट पटलीच नाही...सगळे उलट मलाच हसले..आणि तेव्हा पासून ताई मला चिडवायचे झाले की माझ्यासमोर हा सगळा किस्सा नवनवीन लोकांना सांगत राहते. विक्रम..तिचा नवरा..आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना पण "निशा शेळीला घाबरते" हे तिने सांगून ठेवले आहे.

तर अशा माझ्या बहिणीला मग मी एअरपोर्टवरून फोन केला....जरी मी स्पष्ट काही सांगितले नाही तरी..घरून निघतानाचे...."काही काळजी करू नका..एकटी असले तरी मी नीट जाईन"...हे अवसान गेले होते...हे तिला समजले.तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. फ़्लाईट ११:३० ची होती. मग साधारण दर अर्ध्या तासाने...मी विमानात बसेपर्यंत ती मला फोन करत राहिली..आणि चहा घेतला का, कुठे बसली आहेस?...सामानाकडे लक्ष दे....असल्या फ़ुटकळ गप्पा मारत राहिली.मला का भिती वाटतेय हे निदान एका व्यक्तीला तरी समजल्यामुळे....आणि तसे पण....सिंगापूरपर्यंत विमानाने..आणि मग कॅब ने हॉटेलवर पोचेपर्यंत प्रवास नीट झल्याने मी सावरले झाले होते. हॉटेलच्या रूम वर पोचले...खाली जाऊन सिंगापूरच्या प्लग पॉइंट मध्ये लॅपटॉप चा चार्जर लावण्यासाठी कनव्हर्टर घेऊन आले. आणि पहिले घरी..आणि मग ताईला फोन करून मी नीट पोचल्याचे कळवले. ताईला फोनवर मी व्यवस्थित असल्याचे सांगितले..त्यावर ती हसून म्हटली..."शेळीला घाबरणारी मुलगी सिंगापूर ला एकटी गेली!!"

असो...एअरपोर्टवर माझ्या मित्राने दिलेला सल्ला खरेतर काही चुकीचा नव्हता...हे आता पटतंय..पण त्या वेळेला भिती वाटणं साहजिक आहे..हे त्याला समजलं नाही. आता मला परदेशप्रवासाचा भरपूर अनुभव आहे म्हणून ओळखीतले पहिल्यांदा प्रवास करणारे जेव्हा मला सल्ला विचारतात..तेव्हा मी माझ्या मित्राने मला सांगितलेली वाक्येच त्यांना ऐकवते.

पण...एका गोष्टीची मला कायम खात्री होती..आणि आहे...भले शिंगे मारण्यासाठी नसेल...माझ्याकडे तिला खाण्यायोग्य काहीतरी आहे असे वाटून असेल कदाचित...पण त्या शेळीने माझा पाठलाग केला होता हे नक्की!!!!!!

Wednesday, October 10, 2007

इक वो दिन भी थे.......इक ये दिन भी है......

२८ सप्टेंबर २००७

share trading सध्या एकदम जोरात सुरू आहे. मार्केट पण एकदम वर..... मी इतके दिवस विचार करायचे....आपण काय फारच कमी trading करतो. त्यातूनपण नफा मोजकाच!...मग हे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवायची गरज नाही...कुणाच्या लक्षात येणार आहे?....पण परवा कुणाशीतरी बोलताना एकदम ट्युब पेटली....बस का निशा....तू इतकी चमी कशी??.....अग बाळे...आपला पॅन नंबर दिलेला असतो ट्रेडींग अकाउंट उघडताना.....सरकार दरबारी जरी कितीही लाल फित कारभार असला...तरी दिवसेंदिवस ते पण technology wise पुढे चालले आहेत.....return e-filing व्हायला लागलेत....उद्या त्यांनी फ़क्त पडताळून पाहायचं ठरवलं तर माझी ही "तथाकथित लपवलेली" मिळकत trace होणे किती सोप्पं आहे!!! आणि मुख्य म्हणजे याबाबत आपण लपवालपवी करायला काही संधीच नाहीये.

काय करणार बापडी....म्हटलं चला निदान माझ्या शेअर बाजारातल्या छोट्याशा मिळकतीतला किती भाग त्यांच्या घशात जाणार आहे ते तरी मोजून बघू! trading acccount उघडलं...सगळया transactions चा रिपोर्ट काढला. पण short term आणि long term capital gain calculate करणं पटकन जमेना. आणि मग मला आठवलं काही वर्षापुर्वी मीच from scratch डेव्हलप केलेलं SimAcc!!!!!............hhhmmmm....जे मला आत्ता बघायचं आहे बरोब्बर तोच रिपोर्ट मी SimAcc मध्ये बनवला होता आणि commerce ची अजिबात अक्कल नसलेल्या मला अकाउंट्स...शेअर.....बॅलन्स शीट...हे सगळं समजून मग त्याचं application मध्ये रुपांतर करताना डोक्याचा भुगा झाला होता. काश.........आत्ता मला शेअर मार्केट बद्दल माहित आहे...तेवढं तेव्हा माहीत असतं.....मी अजून कितीतरी चांगली बनवली असती सगळी system!!!

माझ्याकडे अशाच पडलेल्या पुर्वीच्या Sinewave च्या CD शोधायला सुरूवात केली, एक मिळेल तर शपथ!!! मग Sinewave च्या site वर गेले. मी एकेकाळी design केलेल्या site चे रंगरूप पूर्ण बदलले होते. चांगलं होतं..पण आतमध्ये कुठेतरी छोटसं वाईट वाटलं. बावळट पणा होता...मी सोडल्यानंतर काय गोष्टी कायम तशाच राहणार होत्या??...मी पुढे जातेय.....बदलतेय......तिकडे पण बदल होतच राहणार....."बदल ही एकच गोष्ट जगात कायम असते!"....योग्य वेळी प्रसिद्ध ओळ आठवली. तेव्हा कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं...कधीकाळी मीच Develop केलेलं product असं Download करुन वापरावं लागेल. अर्धा तास Download केलं...install केलं. तो चिरपरिचित Taxbase चा login screen ओपन झाला!!!!..... मी स्वत:च त्या स्क्रीनवर किती वेळेला काम केले होते!!! तिथून SimAcc...तो SimAcc Home चा स्क्रिन दिसला.......आणि काय वाटलं ते वर्णन करणं अशक्य आहे!!..कुंभ के मेले मे बिछडा हुआ...मेरा बच्चा अचानक मुझे मिल गया!!!!.......

माझ्या सारख्या माणसांच काही होऊ शकत नाही....निर्जीव वस्तूंच्या पण प्रेमात पडतात.....माझी खुर्ची....माझी जागा....मी बनवलेलं software...आणि सानिध्यात आलेली प्रत्येक गोष्ट...प्रत्येक गोष्टीशी स्वत:ला जोडते.(म्हणूनच माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा छाप असेल याची मी काळजी घेते..पन्नास एकसारख्या work-stations मधून माझं work-station कसं सहज वेगळं दिसतं हे माझ्या आजूबाजूला बसणा-यांना लगेच कळू शकतं!!).......आणि मग सोडून जायची वेळ आली की वाईट वाटतं....

Sinewave च्या बाबतीत वाटणारी attachment थोडी जास्त आहे. जेव्हा माझी खात्री होत चालली होती की IT field मध्ये आपलं काही होत नाही...२००१ साल....पुर्ण slack period......मोठ्या मोठ्या कंपन्या experienced लोकांना काढताहेत....तिथं आपल्या सारख्या फ़क्त science graduate....engineer पण नाही...अशा फ़्रेशरचा काय पाड लागणार??....आपण आपले कुठे तरी फॅकल्टी किंवा data entry operator म्हणून चिकटणार....आणि मग कुठल्या तरी मिडीऑकर माणसाशी लग्न करून त्याचा मिडीऑकर संसार सांभळणार....आणि अगदी समजा ग्रेट नवरा मिळलाच...तर त्याच्यापुढे आपली लायकी ती काय.......म्हणून सगळं आयुष्य inferiority complex मध्ये घालवणार!!! अशा मनस्थिती मध्ये NIIT तून development interview चा शेवटचा चान्स म्हणून sinewave ला गेले...आणि जंगल मे मंगल हो गया.......sinewave मे हम पहले ४ दिन QA...और फ़िर डेव्हलपर हो गये!

तीन वर्षे तिथं अगदी वेड्यासारखं काम केलंय....किती वेळेला मला एखाद्या प्रोब्लेम चे solution झोपेतून मध्येच जाग आल्यावर किंवा ब्रश नाहीतर आंघोळ करता करता एकदम सुचायचं...आणि ऑफ़िस ला जाऊन ते try out करून बघितल्या शिवाय मग चैन पडत नसे. customer support माझा पहिला प्रोजेक्ट...आणि sinewave चं in-house software....दररोज ऑफ़िसमध्ये निदान १०-१२ कॉम्प्युटर्स वर ते चालू असलेलं बघून आणि आपण बनवलेल्या product लोकांना अवलंबून असलेलं पाहून इतकं समाधान वाटायचं ना......

yardi चं ऑफर लेटर हातात मिळाल्यावर मी ज्या दिवशी sinewave मध्ये resign केले होतं...रात्री घरी येऊन रडले होते....रडताना पण एकीकडे कळत होतं.....हे विनोदी आहे.....नवीन चांगला job मिळाला आहे....आपल्याला आनंद पण झालाय...आणि एकीकडे रडतोय.....उद्या जाम हसू येईल स्वत:लाच अशा पोरकटपणा वर....आणि आता ते तसं येतं ही!!! पण नवीन job चा आनंद जितका खरा होता...तितकेच त्या वेळी डोळ्यात आलेले अश्रू पण.....ते फ़क्त त्या क्षणासाठी होते....आणि त्या क्षणापुरते १०० टक्के खरे सुद्धा!

जशी sinewave साठी मनात खास जागा आहे....तशीच yardi साठी पण....sinewave माझ्या स्वप्नांपर्यंत जाण्याची पायवाट दाखवली असेल तर....yardi ने त्या पायवाटेचा express highway केला. भविष्यात कधी तरी...जेव्हा कदाचित yardi ला पण निरोप द्यायची वेळ येईल...तेव्हा पण मी रडणार आहे...मला माहितीये....आणि मग काही वर्षांनी त्या रडण्यावर हसेन पण!!.....express highway वर पुढे जाताना कदाचित पुढे पण काही चांगले विसावे भेटतील....पण Sinewave आणि Yardi...कायमच special राहतील.

असो....तरीही कुंभमेळ्यात सापडलेल्या "मेरा बच्चा" ची संगत थोड्याच दिवसाची आहे. ३० दिवसांचं trial license संपेल.(आणि १०,००० च्या नफ़्याचा हिशोब ठेवण्यासाठी मी ६,००० चं license विकत नक्कीच घेणार नाहीये!!)..आणि मग तो मला login screen च्या पुढे जाऊ देणार नाही. बहुतांशी डेव्हलपर्स सारखं मी माझ्या स्वत:साठी मागचे बरेच दरवाजे उघडे ठेवले होते....अगदी license चेक bypass करण्यासाठी पण मार्ग तयार केले होते. पण शेवट च्या काही महिन्यांमध्ये अपघाताने कोणाला तरी त्या चोरट्या मार्गांचा शोध लागेल आणि ते फ़ार भयानक ठरू शकेल....म्हणून मीच सगळे बंद केले.परत ते चोर दरवाजे उघडण्याच्या किल्ल्या काळाच्या ओघात माझ्या आठवणीतून पुसट झाल्या आहेत..त्यामुळे बंद दरवाज्याकडे बघून परत फ़िरण्याशिवाय मी दुसरं आता काही करू शकणार नाही................

Thursday, August 16, 2007

अमेरिकावारी २ - स्काय डायव्हिंग - अजून एक धाडस!!!!!

११ ऑगस्ट २००७


जसे मी दुस-यांदा इथे पोचले होते तेव्हापासूनच या वेळी स्काय डायव्हिंग कराययचं....करायचं...असा नुसता जप चालला होता पण खरंच चौकशी करून बुकींग काही होत नव्हतं. पाच वीक एन्ड्स तसेच गेल्यावर शेवटी म्हटलं...बास्स......या वीक एन्डला...."होऊन जाऊ दे!!!!".... जमतील तेवढे गडी जमवायचे...लोक उगाच जास्त हो..नाही करायला लागले तर आपलं आपण जायचं .........पण.....जायचंच!!.....

शेवटी मी, दिपक आणि विशाल...तीनच लोक फ़ायनल येणार असं ठरलं. बुधवारी वेबसाईट नीट बघितली. फोन नंबर घेऊन तिथे बुकिंग साठी मी फोन केला. क्रेडिट कार्ड चे डिटेल्स दिले. सगळी माहिती...सूचना झाल्यावर तिथली ती बया मला म्हटली पेमेंट तुम्ही इथं येऊन करू शकता पण बुकींग कॅन्सल करायचं असेल तर फक्त पुढच्या चोवीस तासात करता येईल. त्या नंतर कॅन्सल केलं किंवा त्या दिवशी आम्ही तिथं तोंडच दाखवलं नाही तर माणशी ५० डॉलर चा चार्ज ती त्या क्रेडिट कार्ड वर लावेल. अन मी बावळट सारखा कंपनी च्या क्रेडीट कार्ड ऎवजी माझ्या पर्सनल क्रेडीट कार्डचा नंबर तिला दिला होता. दिपक अन विशाल ला सांगितलं...बाबांनो....आता प्लॅन चेंज करू नका. न केलेल्या गोष्टीसाठी कंपनी पैसे देणार नाही आणि फुकट ५० डॉलरला फोडणी! दुस-या दिवशी.....२४ तास उलटून गेल्यावर मनात म्हटलं...चला...आता मागं फिरणं अशक्य....५० डॉलर फ़ुकट जाऊ नयेत म्हणून तरी जावंच लागेल...कितीही भिती वाटली तरी :))

बास्स...अन त्या क्षणापासून जेव्हा विचार करायला थोडा वेळ मिळाला...आत्तापर्यंत फोटो आणि व्हिडिओ मध्येच पाहिलेले विमानातून खाली कसं दिसतं ते सीन्स डोळ्यासमोर यायला लागले. मग बरोबरच Universal Studio आणि Disneyland च्या roller coaster राईड्सवर जे climax moment ला जीव घाबरा झाला होता...ते आठवायला लागलं. disneyland च्या milliboomer ride var ती trolly झूम्मदिशी खाली येताना...हवेत अधांतरी असताना कसं विचित्र वाटतं ते आठवून तर..स्वत:ला बळेच घाबरवायची हौस आपल्याला का आलीय असा प्रश्न पडायला लागला.विमानातून उडी मारताना आणि मारल्यावर कसं वाटेल याचा विचार करणं शेवटी प्रयत्नपूर्वक बंद केलं. आयुष्यात पहिल्यांदा...एखाद्या गोष्टीचा intentionally विचार "न करणे" मला चक्क जमलं.

शेवटी तो दिवस...शनिवार उजाडला.बरोबर एक वर्षापुर्वी ११ ऑगस्ट २००६.....मी माझ्या पहिल्या अमेरिका भेटीसाठी सांता बार्बराला पोचले होते. परदेशगमन, घरच्यांपासून दूर एकटी राहणे, विमानप्रवास....ब-याच गोष्टी पहिल्यांदा करत होते...it was like an adventure only!दुसऱ्या अमेरिका भेटीत ११ ऑगस्ट २००७, बरोबर एक वर्षाने अजून एक साहस करायला निघाले होते..sky diving..तसे काही खूप great नाही...पण करताना भिती वाटणार...हे साहजिक होते.

सकाळी सगळं आवरून कॅबने तिथे पोचता पोचता १०:१५ झाले. आमचे बुकिंग ११ चे होते so बराच वेळ होता. मी फोनवरून जिच्याशी बोलले होते त्या मुलीने आम्हाला २-३ फॉर्म्स भरायला दिले आणि एक व्हिडिओ लावून दिला.फॉर्म्समध्ये सगळीकडे आम्हाला सही करून मान्य करायचं होतं की हे सगळे आम्ही पुर्णपणे स्वत:च्या मर्जीने करतो आहोत, आम्हाला यात असलेले सगळे धोके माहीत आहेत. हे करताना अपघात होऊन आम्हाला कायमचे अपंगत्व किंवा मॄत्यू पण होऊ शकतो आणि हे लोक त्यासाठी जबाबदार नाहीत. स्काय डायव्हिंग करताना झालेले अपघात कोणत्याही इन्शुरन्सने कव्हर होत नाहीत....वगैरे वगैरे. हे असले सगळे मुद्दे वाचल्यावर "चला...गुपचुप परत जाऊ या" अशा हास्यास्पद कल्पनेचा दोन मिनिट साठी विचार करून आम्ही त्यावर सह्या केल्या.


आधीच्या एका राऊंडचे लोक खिदळत परत आले, त्यांना हसताना बघून जरा बरं वाटतंय न वाटतंय तोच तिथल्या एका जंपरने स्वत:ची ओळख करून दिली आणि तो सूट घालायला चला असं सांगितलं. अंगावर तो सूट आणि पुढच्या फेरीच्या विमानाचा टेक-ऑफ करतानाचा आवाज....ह्रुदयाचे ठोके परत जलद पडायला लागले.त्यांच्या कॅमेरामनने छोटीशी मुलाखत घेतली अन शेवटी मी आणि दिपक एकाच विमानात आपापल्या जंपर आणि कॅमेरामन बरोबर चढलो. दिपक खूप exite झाला होता किंबहुना माझ्यापेक्षा जास्त! विमान तसे यथातथाच होतं....सीट्स थोडी फाटली होती...मुळात तिथं कोणी आरामात बसावं याचा विचार करून ते बनवलं गेलंच नव्हतं...लोकांना वरती घेऊन जा आणि हवेत त्यांना उडी मारायला लावा...सरळ आणि जलद काम!!


विमान सुरू झालं....ठोके आणखी जलद.... जसं विमानने जमीन सोडली...विमानातून उडी मारताना कसं वाटेल...हा विचार थांबवण अशक्य झालं. विमान जमिनीला समांतर होतच नव्हतं...सारखं तिरपं वर वर चढत होतं. बाहेर पाहून अजून टेन्शन येत होतं. सारखं वाटत होतं...आपण मुर्ख आहोत का...भिती वाटत असताना आपण का हे करायला आलो? पण दुसरीकडे हा पण विचार होता..मी भारतात परत गेल्यावर असं काहितरी थ्रिलिंग कधीच करणार नाहीये...आणि वरती हवेत खरंखरं तरंगत असताना खाली बघायला कसं वाटतं हा अनुभव मला निदान एकदा तरी घ्यायचाच होता.


मध्ये एकदा त्या जंपर ने माझा सूट त्याच्या सूटशी जोडला...थोडा वेळ गेला आणि मग इतका वेळ माझ्यासमोर बसलेला कॅमेरामन उठला आणि आमच्या जंपर्सने आम्हाला विचारले...पहिले उडी कोण मारणार?...मी क्षणार्धात..मी मारणार असं सांगितलं...कारण एकच...माझ्या आधी दिपकला विमातून अक्षरश: पडताना पाहून मला जास्त टेन्शन आलं असतं. मी तो गॉगल चढवला. कॅमेरामन ने दरवाजा उघडला आणि माझ्या डोक्यात शब्दश: घंटी वाजली...येस्स...शेवटी तो क्षण येऊन ठेपलाय...दरवाजा उघडल्यावर १०५०० फ़ूटावरचं वारं लागलं..खाली छोटी छोटी शेतं आणि रस्ते दिसत होते. मी पुढे आणि तो जंपर मागे..असे आम्ही दारापाशी गेलो.त्याने मला मान वर कर, हात कसे ठेवायचे अशा किरकोळ सूचना आधीच दिल्या होत्या. त्या सगळ्यांची छोटीशी उजळणी करून त्याने मला उजवा गुढगा अगदी दाराशी टेकवायला सांगितला, मान वर..हात खांद्यापाशी...आठवत नाही की माझे डोळे बंद होते का उघडे...आणि....त्याने....say 1......2.....and threeeeeeeeeeeeeeeeeeeeee......असं म्हणून...स्वत:ला आणि मला विमानाबाहेर झोकून दिलं!!!!.......


मला वाटतं (म्हणजे नंतर व्हिडिओ पाहिल्यावर कळलं!) हवेत...दोन तीन वेळा कोलांट्या उड्या मारल्यावर आम्ही जमिनीकडे बघायला लागलो...आणि मला स्स्सेममम......disneyland च्या राईड वर जे वाटले होते तेचं वाटंलं...हवेत अधांतरी...trying to hold on to something but not getting any support...चेह-यावर जोरात वारं लागत होतं...आणि नेमका अंदाज नाही आला तरी ती खाली दिसणारी शेतं आणि आपल्यामधलं अंतर भर्रकन कमी होत चाललंय हे जाणवलं...शेतं थोडी मोठी दिसायला लागली...जो काय अनुभव येत होता तो मती गुंग करणारा होता हे नक्की!..मला वाटतं...माझ्या चेह-यावर भिती आणि आश्चर्य यांचा काहितरी मिश्रण झालं असावं पण हसत नव्हते. तितक्यात तो कॅमेरामन कुठूनतरी आमच्या आसपास आला आणि मला फोटोसाठी पोझ दे असा इशारा केला. तोपर्यंत माझे हात खांद्याजवळ्च होते. त्याच्या सांगण्यावरून मी हात पूर्ण हवेत पसरले आणि काय सांगू....मस्त वाटलं...इतका वेळ आपण पडतोय असं वाटत होतं...हात हवेत पसरल्यावर उडतोय असं वाटायला लागलं....आणि मी त्याला फोटो साठी स्माईल दिली..त्या कॅमेरामन माझं जे काय लक्ष विचलित केलं त्यामुळे माझ्या थ्रिल फिलींगने भिती वर मात केली आणि मला खरंच मजा यायला लागली (व्हिडीओ पाहिल्यावर कळलं...मी चांगली ओरडत होते की!!) आमचा खाली येण्याचा वेग...आणि आजूबाजूची हवा...आणि कदाचित अजून फ़ार लांब न गेलेले विमान, सगळ्यांचा मिळून खूप आवाज येत होता.


असं किती वेळ नक्की चालू होतं खरंच आठ्वत नाही...पण निदान ४०-४५ सेकंद तरी नक्कीच!उलटा पालटा होत तो कॅमेरामन परत एकदा जवळ आला...परत काही फोटो...आणि तो दूर गेला....आणि एक जबरदस्त झटका बसला....जे काय मी आधीचे ३०-३५ सेकंद हसत होते ते परत बंद झाले. त्या जंपर ने पॅराशुट उघडल्यामुळे बसलेला तो झटका होता..नंतर माझा...विशाल आणि दिपक चे व्हिडिओ पाहिल्यावर कळलं जंपर्स आणि कॅमेरामनचा पॅराशुट उघडण्याचा वेळी विशिष्ट संकेत होता. पॅराशूटला आणि त्या जंपरला मी ज्या बेल्टसमुळे जोडले होते,या झटक्यामुळे ते जबरदस्त काचायला लागले. पण जसं पॅराशूट उघडलं तसं एकदम आजूबाजूचे आवाज थांबले अन शांतता झाली फ़क्त पॅराशूट्च्या फडफडण्याचा आवाज काय तो येत होता. त्या जंपरने ते काचणारे बेल्ट्स थोडे सैल केले मग माझं आजूबाजूला लक्ष गेलं...and it was simply amazing........मी आजवर जेव्हा केव्हा विमानप्रवास केलाय...हट्टाने नेहमी खिडकीजवळचं सीट घेतलंय...कारण..विमान टेक-ऑफ आणि लॅंड होताना अन एरवीसुद्धा खिडकीतून दिसणारं दॄष्य मला फ़ार आवडतं. पण हे तर त्यापेक्षा सुंदर होतं..मुख्य म्हणजे मध्ये काच नव्हती. ते दॄष्य फ़क्त डोळ्यांना दिसत नव्हतं त्याचं पूर्ण वातावरण जाणवत होतं...(मी disneyland मध्ये घेतलेली soarin california राईड ह्या अनुभवाची सर्वात जवळ जाणारी कॉपी होती..जिथे हयासारखाच अनुभव visual stimulation ने देतात. मला स्वत:ला freefall पेक्षा हा हवेत पॅराशूटने तरंगण्याचा अनुभव जास्त आवडला.


थोड्या वेळाने दिपक चे पॅराशूट हेलकावत आमच्यापेक्षा लवकर खाली जाताना दिसले (नंतर कळलं पॅराशूट्ची दिशा ठरवणारे दोर त्याच्या जंपरने त्याच्या हातात दिले होते) पण मला जास्त हेलकावे न खाता हळूहळू खाली येणे जास्त आवडले. हवेत थोडा वेळ जास्त तरंगता आलं त्यामुळे!! जशी जमीन जवळ आली तसं पाय जमिनीला टेकवायचे ते मला सांगितलं..आणि त्यानंतर सुमारे दोन मिनिटांनी आम्ही शेवटी लॅंड झालो.

लॅंड झाल्यावर लगेच नाही कळलं तरी त्या सेंटर मधून बाहेर पडल्यावर मला काही वेळ इतकं गळून गेल्यासारखं झालं की असं वाटतं होतं बाकी काही करं नये..झोपावं आणि निदान २४ तास तरी उठू नये!
मला माहीत आहे...हे मी परत कधी करणार नाहीये...एकतर खूप महाग आहे...आणि पहिल्यांदा निदान मला नक्की माहीत नव्हतं की freefall होताना कसं वाटतं...आता माहीत आहे...त्यामुळे मी पहिल्यापासूनच जास्त घाबरलेली असेन...coz i will know what is coming....मी काय इतकी पण शूर नाही...सो......हा माझा स्काय डायव्हिंगचा पहिला आणि शेवटचा अनुभव....पण अजून ब-याच(म्हणजे लय लय बर का!!) वर्षांनी मी माझ्या नातवंडाना सांगेन...."खूप भिती वाटत असूनसुद्धा तुमच्या आजीने एकदा विमानातून उडी मारली...आहात कुठे????" :))))))
-निशा.
स्काय डाइव्ह व्हिडीओ : http://www.esnips.com/web/NishsHomeVideos

Saturday, July 28, 2007

माझी अमेरिका वारी...दुस-यांदा!!!!

२७-जुलै-२००७
एकदा शब्दांशी खेळता येतं हे कळल्यापासून मला हा छंदच लागलाय, मनात येणारी प्रत्येक गोष्ट यमक जुळणार-या ओळीत पकडायचा प्रयत्न करायचा!!

कुठलातरी कवी चावला मला बहुतेक! :))))

ही गरम गरम.....ताजी ताजी कविता......माझे विचार....अमेरिकेबद्दलचे!!!!!



कोलंबसच्या या देशात
पोचलेय मी दुस-यांदा,
सगळ्यांनाच मोहवणा-या
अमेरिके मध्ये परत एकदा....

काय हवंय मला नक्की
मलाच कधी कधी कळत नाही,
माझ्या माणसांजवळ राहाणं कायम छान
कि हवं आहे पूर्ण स्वातंत्र्य अन् सुखसोयी....

प्रश्न पडतो मला हा नेहमी
आवडेल का मला इथेच थांबायला,
आयुष्य कसं छान चालेल
नसेल जागा कदाचित नाव ठेवायला....

जरी आवडला मला खूप
इथे मिळणारा स्वतंत्रपणा,
तरी माझ्या माणसांपासून दूर
मध्येच एकटेपणा लागतो बोचायला....

इथे फ़क्त प्रत्येकाला सवय
स्वत:पुरते पाहण्याची,
एकमेकांच्या खाजगी आयुष्यात
चुकून ही न डोकावण्याची....

मग मला आठवते
मागे राहिलेले माझे घर,
नसेल इथल्यासारखा रेखीव
पण ओळखीचा परिसर....

पाहते जेव्हा इथे कायम राहणारे
लोक माझ्या देशातले,
ना धड इथे पूर्ण रुजलेले
ना तिकडचे पण राहिलेले...

एकदा इथली सवय झाल्यानंतर
मग तिकडचं काहीच नाही आवडत,
हव्या असतात फ़क्त इथल्या चांगल्या गोष्टी
बाकी सगळं मात्र मन नाही स्वीकारत....

नाही पाहायची मला मुळीच
माझी अशी स्थिती झालेली,
स्वत: मनाने भारतीय राहिले तरी
पुढची पिढी अमेरिकन झालेली....

मग हरघडी त्याना पाहून
मनात आपल्या शंका येत राहणार,
बरोबर होता का इथं राहाण्याचा निर्णय
हि गोष्ट कायम खात राहणार....

एकदा या मोहात पडले तर
माहीत आहे पडेल नंतर संभ्रम,
अजून काही वर्षे राहावे की परतावे
हा तिढा सुटणार नाही कायम....

असू दे गर्दी, खड्डे अन् प्रदूषण
माझं पुणंच शेवटी खरं,
असू देत चार सुखसोयी कमी
पण माझ्या पुण्यात राहावं हेच बरं!!!!!!!!

Monday, June 4, 2007

अगतिकता.....का...का....का?????

१५-Aug-२००५

यार्दी join करून चार महिने झाले. Yardi मध्ये आल्यावर मी sinewave मध्ये किती हमाली करत होते ते लक्षात येतंय. पण जाऊ दे!!!!....तो अनुभव मला बरंच काही शिकवून गेला. आणि माझा विश्वास आहे की "समय से पहले और भाग्यसे अधिक किसी को कुछ मिलनेवाला नही है।"

xxxला पण यार्दी मध्ये job मिळावा असं फार वाटत होतं पण तो interview clear करू शकला नाही परवा!! माझ्या आता असं लक्षात आलंय no matter how much you care for a person and no matter how hard you try to protect them and try to give them the best in life....you can not change one's destiny!!!! एखाद्याच्या नशिबातच physically आणि mentally suffer होणं असेल तर माझी लाख इच्छा असू दे, अगतिकपणे त्यांना suffer होताना पाहण्याशिवाय मी काही करू शकत नाही.

xxxच्या बाबतीत पण माझा असाच अनुभव आहे..माझी लाख इच्छा असू दे......की हिच्या सगळया गोष्टी सहजपणे व्हाव्यात....तिची खूप इच्छा असलेल्या गोष्टी तिच्या बाबतीत घडाव्यात...पण तिच्या शेजारी बसून आधी तिला प्रोत्साहन देणे...आणि तिच्या मनासारखे घडले नाही तर तिची समजूत घालणे...याशिवाय मी काहीच करू शकत नाही! ब-याच वेळेला स्वत:च्या या अगतिकतेचा संताप येतो असं वाटतं मला माहीत आहे...these good people deserve all the good things in life and I see them getting hurt and disappointed all the time. And all I can do is sit and watch!!!!!! why I cant be more powerful and in control of things????

फक्त प्रश्न आहेत....त्यांची उत्तरे नाहीत....xxच्या बाबतीत मी कधी काय करू शकले?? पुर्वी मल वाटायचं, खूप पैसा आला की माणूस powerful आणि controlling बनतो. पण नाही....पैसा सुद्धा सगळे प्रश्न सोडवू शकत नाही.

Sunday, May 13, 2007

जीवाचा मधूनच देवदास!......

पुस्तक परीक्षणांशिवाय.......मी माझ्या दैनंदिनीत अजून खंडीभर गोष्टी लिहील्या आहेत...लिहिते.....दैनंदिनी म्हणजे रोज काही लिहीतेच असं नाही.....लिहीण्यासारखं घडलं...वेळ असला........आणि मुख्यत: मधूनच कधीतरी "हळ्वी आणि जास्त विचार करणारी मी" जागी होते.....तेव्हा डायरीची पाने हमखास पांढ-याची काळी होतात. एरवी महिना महिना मी ती उघडत नाही....

असेच काही विचार.....खास कुठल्या घटनेवर मी केलेला काथ्याकूट...."आपण कसे आहोत" याबद्दल मी खरडलेले काही परिच्छेद इथे देते आहे. काही ठिकाणी कदाचित xxxxxxx दिसतील....ते माझे खाजगी (मला प्रकाशित करण्याची इच्छा नाही...असे काही) असलेल्या वाक्यांच्या जागी टाकलेत.....

जे शब्द मी डायरीत इंग्लिशमध्ये लिहिलेत...ते मराठीत भाषांतर करण्याच्या भानगडीत न पडता...तसेच इंग्लिश मध्येच लिहीलेत.....


१२-Nov-२००५

हं........xxxxx xxxxxxx xxxx xxxxx xxxx xxxxxxx. जाऊ दे....फार काही सुख दु:ख नाही...हल्ली.....हल्लीच काय...जशी मी नोकरी करायला लागले आहे..आणि शांत बसून विचार करायला वेळ मिळेनासा झालाय....तसे मला वाटते..nothing really touches my heart anymore!..... असे वाटते...पुर्वी कशा सगळ्या feelings intense असायच्या....आणि हल्ली...its like.....just for the sake of it.......आजूबाजूला घडणा-या गोष्टी आणि heart यांच्यामध्ये एक buffer तयार झालाय असं वाटतं ( कॉलेस्ट्रॉल चा असेल का?) बाहेरून घडणा-या कुठल्याही गोष्टींचे परिणाम या buffer मध्ये mild होऊन मगच heart पर्यंत पोचतात...very mild...so my reactions are even milder!....कळत नाही घटनाच तेवढी तीव्र नव्हती...की...intense reaction न देण्याची हल्ली माझी tendancy झाली आहे.

पण सांगू का its like a drug........पुर्वी फार विचार करायचे....फार react व्हायचे.....त्रास व्हायचा....हे आता म्हणजे नशेत असल्यासारखं आहे...त्या अंमलाखाली कसं...कळतं...हे खरं नाही......पण तरी बरं वाटतं....तात्पुरते का होईना! हे सदैव busy असणं म्हणूनच मला बरं वाटतं...नशा झाल्यासारखे झाले आहे...नकली आहे...सुखी नाही...पण निदान पुर्वीसारखी दु:खी तरी नाही!......

काय मी देवदास स्टाईल ने लिहीते आहे...पण हे आत्ता लिहीलं आहे एवढंच...वाटतं मला कायम असंच!!!

आत्ता "मै, मेरी पत्नी ऒर वो" पाहीला...राजपाल यादव....best!!!....हिर्रॉईन पण छान होती...ब-याच दिवसांनी कुठलातरी पिक्चर पाहताना डोळ्यात पाणी आलं..तरी...मला वाटतं...शेवट अजून थोडा senti करता आला असता...असो....ठीक आहे.

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....टाईमपास..

हल्ली पुस्तकं वाचणं खूपच कमी झालंय.....पण एक काळ असा होता की मी वेड्यासारखी(का अधाशासारखी?) वाचायचे....नुसती वाचायचे नाही...त्यावर खूप विचार पण करायचे..त्या वेळची माझी डायरी माझ्या पुस्तक परीक्षणांनी भरलेली आहे......त्यातली काही इथे.....

२३-Oct-२००२

टाईमपास.......

हल्ली डायरी लिहायला जमतच नाही..मध्ये प्रोतिमा बेदीचं "टाईमपास" वाचल्यावर मी खूप अस्वस्थ होते. डायरी लिहायची म्हणून दोन दिवस बरोबर डायरी घेऊन फिरत होते. पण काम इतकं होतं की कसला, कुठला वाईट मूड!! तो गेला कुठेतरी कोप-यात!

हे लिहावं..ते लिहावं..मनात बरंच होतं..आत्ताही ते सगळं आठवतंय...पण intensity संपल्यानंतर त्यांची value फक्त एखाद्या भिकार नाटकातल्या नकली संवादाइतकी वाटतेय...त्यामुळे मी ते आता लिहीणार नाही.

पण पुस्तक वाचल्यावर आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, जगायचंय आणि हे काय आपण हजारो, लाखो लोकांसारखं घर, नोकरी करतोय असं खूप वाटलं! ती प्रोतिमा बेदी काय सही आयुष्य जगली आणि मी हे काय करतेय..हे फार जाणवलं...

Any ways a really nice book!!!!

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....राब....

हल्ली पुस्तकं वाचणं खूपच कमी झालंय.....पण एक काळ असा होता की मी वेड्यासारखी(का अधाशासारखी?) वाचायचे....नुसती वाचायचे नाही...त्यावर खूप विचार पण करायचे..त्या वेळची माझी डायरी माझ्या पुस्तक परीक्षणांनी भरलेली आहे......त्यातली काही इथे.....

१८-Dec-२००१

राब......

मध्यंतरी सुहास शिरवळकरांची पुस्तकं वाचत होते. वाचायला बरी असली तरी डोक्याला काहीच खाद्य नाही. पुस्तक बंद केल्यावरही डोक्यात राहील असं काहीच नाही.

काल अनंत मनोहरांचं "राब" आणलं होतं.... सही!! तसं आधी एकदा वाचलं होतं पण छान वाटलं आणि दुसरं काही नवीन सापडलं नाही म्हणून परत एकदा आणलं.

कोकणातल्या सामान्य शेतकरी जीवनावरची कथा! निसर्गाची, त्यांच्या आयुष्याची मस्त वर्णनं!! मला नेमकं याच गोष्टींचं वर्णनं वाचायला आवडतात आणि कोकणातल्या आयुष्याबद्दल जरा अधिकच! कधी पुढं आयुष्यात मी शहरात आरामात जगायला पुरेल त्यापेक्षा जास्त पैसा कमावला तर कोकणातल्या एखाद्या लहानशा गावात समुद्रकिनारी टुमदार कौलारू घर, नारळी-पोफळीच्या बागा, शेती या गोष्टी मी घेणार आहे.

शहरातल्या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आला की ( जो मला नेहमीच येतो!!) गावी निवांत राहायला हक्काचं घर आणि उत्पन्नाचं आणि वेळ घालवायला साधन म्हणून शेती वाडी असावी असं माझं एक स्वप्न आहे.

आणि जर असं काही घर-शेती मी घेतलीच तर म्हातारपणी कायमसाठी तिथे जाईन, माझ्या नातवंडाना आजोळी येण्यासाठी मस्त स्वप्नातल्यासारखं घर ठेवेन!...

हं...............फार पुढच्या गोष्टी झाल्या. आधी पोटापाण्यापुरता पैसा मिळणारी नोकरी तर मिळू दे!!!!!

Saturday, May 12, 2007

एक अपघात..माझ्या डोळयासमोर घडलेला.....

पुस्तक परीक्षणांशिवाय.......मी माझ्या दैनंदिनीत अजून खंडीभर गोष्टी लिहील्या आहेत...लिहिते.....दैनंदिनी म्हणजे रोज काही लिहीतेच असं नाही.....लिहीण्यासारखं घडलं...वेळ असला........आणि मुख्यत: मधूनच कधीतरी "हळ्वी आणि जास्त विचार करणारी मी" जागी होते.....तेव्हा डायरीची पाने हमखास पांढ-याची काळी होतात. एरवी महिना महिना मी ती उघडत नाही....

असेच काही विचार.....खास कुठल्या घटनेवर मी केलेला काथ्याकूट...."आपण कसे आहोत" याबद्दल मी खरडलेले काही परिच्छेद इथे देते आहे. काही ठिकाणी कदाचित xxxxxxx दिसतील....ते माझे खाजगी (मला प्रकाशित करण्याची इच्छा नाही...असे काही) असलेल्या वाक्यांच्या जागी टाकलेत.....

जे शब्द मी डायरीत इंग्लिशमध्ये लिहिलेत...ते मराठीत भाषांतर करण्याच्या भानगडीत न पडता...तसेच इंग्लिश मध्येच लिहीलेत.....

९ -Dec-१९९९

परवा C च्या क्लासहून परत येताना माझ्यासमोर एक accident झाला. एका स्कूटरने रस्ता ओलांडणा-या एका म्हाता-या बाईला उडवले. चालवणार-याला बरंच लागलं, ती बाई तर उडून रस्त्यावर पडली आणि बेशुद्धच झाली. तिलाही बरंच लागलं होतं. तसंच नुसतं बघून पुढे जाणं मला बरं वाटलं नाही म्हणून मी गाडी थांबवली व तिथे गेले. तोपर्यंत लोकांनी तिला रस्त्याच्या कडेला आणलं होतं. पाणी पाजूनही ती शुद्धीवर येत नाही म्हटल्यावर लोकांनी एक रिक्षा थांबवली आणि तिला रिक्षात घातले. त्या वेळी त्या बाईची पिशवी माझ्या हातात होती मग "तुम्ही जरा जाता का?" वगैरे लोकांनी म्हटल्यावर मीही रिक्षात बसले. धनश्रीही बरोबर होती. आम्ही जवळच्याच दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हटले..मेंदूला धक्का बसला आहे...यांना संजीवन मध्ये न्यावं लागेल. तोवर गर्दी पांगली होती आणि डॉक्टरांच ऎकून नंतर रिक्षावालाही म्हणायला लागला की मला दुसरीकडे जायचे आहे, दुसरी कुठलीतरी रिक्षा घ्या. म्हणजे तो ही हात झटकून मोकळा झाला.

इथं मी..नाव..गाव माहित नसलेल्या आणि बेशुद्ध बाई बरोबर!!! आता पूर्ण जबाबदारी माझ्यावर म्हटल्यावर मला खूप टेन्शन आले. क्षणभर तर तिथून पळून जावं का...असा विचार आला..जर तिला काही झालं असतं तर??? पण माझा देव मला अशा परिस्थितीत टाकायला तयार नव्हता. ज्या स्कूटरने धडक दिली त्याच्या मागच्या माणूस तिथं आला आणि आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत..असे म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मग जरा माझं टेन्शन जरा कमी झालं. पण जर तो आला नसता तर मी काय केलं असतं? मी आत्ता सांगू शकत नाही.

"रस्त्यावर अपघात झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी मदत केली नाही" अशी बातमी वाचल्यावर त्या तथाकथित आजूबाजूच्या लोकांना नावं ठेवणं सोप्पं असतं पण जर अशी मदत करायचा प्रयत्न केला तर काय मनस्थिती होऊ शकते याचा अनुभव मला आल्यावर मी जरा नावं ठेवताना जरा विचार करेन. पुन्हा असं कधी माझ्या समोर झालं तर मी मदत करेनच पण आधी अशी कोणाची जबाबदारी घेण्यासाठी जी मानसिक आणि क्वचित लागणारी आर्थिक कुवत आल्याशिवाय अशा गोष्टीत पडणे म्हणजे एखाद्याच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे नंतर "पळून जावं का?" असे विचार यायच्या ऎवजी सुरवातीलाच मी योग्य निर्णय घेईन.

Tuesday, May 8, 2007

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं.... little women ( चौघीजणी)

हल्ली पुस्तकं वाचणं खूपच कमी झालंय.....पण एक काळ असा होता की मी वेड्यासारखी(का अधाशासारखी?) वाचायचे....नुसती वाचायचे नाही...त्यावर खूप विचार पण करायचे..त्या वेळची माझी डायरी माझ्या पुस्तक परीक्षणांनी भरलेली आहे......त्यातली काही इथे.....

२७-Mar-२००२

चौघीजणी..... (Little Women)

आज ’चौघीजणी’ (इंग्लिशमधलं मूळ ’little women') चौथ्यांदा वाचून संपवलं. दर वेळेस प्रमाणे याही वेळेस त्यातल्या emotional आणि दु:खी प्रसंगांच्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि परत तेच पुस्तक सलग दुस-यांदा वाचायचा मला मुळीच कंटाळा आला नसता अशी माझी खात्री आहे. काय छान पुस्तक आहे!..दिडशे वर्षापुर्वी लिहीलेलं आहे तरी अजून evergreen आहे. आता इतक्या वेळेला वाचून त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि एमी ह्या बहिणी आणि त्यांचा मित्र लॉरी हे इतक्या परिचयाचे वाटतात की जणू मी त्यांना प्रत्यक्ष कित्येक वर्षे ओळखते आहे! आणि ज्यो? आहा!..ती तर माझे सर्वात आवडते character आहे! आणि मूळ इंग्लिशचं शांता शेळकेंनी केलेले भाषांतर पण इतकं सहज आणि ओघवतं आहे की ते कुठेही ते बोजड किंवा नकली वाटत नाही.

इंग्लिश पुस्तकांच सुंदर मराठीत भाषांतर करण्यात मी फक्त दोन जणांना मानते, ’विजय देवधर’ आणि ’शांता शेळके’!! बाकी सगळे भाषांतर करणारे मला फालतू वाटतात. मूळ पुस्तकाची गोडी यांच्या घाणेरडया आणि बोजड मराठीने निम्मी कमी होते! बाकी सगळयाबरोबर ’white house' चे अगदी शब्दश: ’श्वेत भवन’ असे भाषांतर करणे हा मुर्खपणा आहे!

'little women' मधल्यासारखा माझ्या पण आयुष्यात कोणी लॉरीसारखा असता तर किती मजा आली असती!!! देखणा, उमदा, हसरा, खटयाळ तरी समजूतदार, सभ्य आणि सुसंस्कृत!!! देखणा आणि सभ्य राहू दे मला कोणी मित्रच नाहीयेत. म्हणजे तसे थोडेफार आहेत, दिपक तर काय अगदी लहानपणा पासून आहे पण माझी मित्र किंवा मैत्रीची जी काय व्याख्या आहे त्यात त्यापैकी कोणीच बसत नाही. ते फक्त माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी माझे विचार, माझं खाजगी आयुष्य त्यांच्यापैकी कोणाबरोबर कधीच share केलेलं नाहीये. नेट वरती भेटलेले पण सगळे काय असेच वरवरचे आहेत. काही मित्र होण्यासारखे वाटतात पण खात्री नाही..आणि माझी check करायची इच्छा नाही. कारण खरंच जर कोणी चांगला वगैरे असेल आणि close friend झाला तर मी प्रेमात पडायचीच शक्यता जास्त वाटते..मग प्रेम...प्रेमभंग!... नको रे बाबा! आत्ता मला माझ्या आयुष्यात असलं काही नकोय. No complications in personal life coz i want to concentrate on my career fully for time being!!!!

Monday, May 7, 2007

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

हल्ली पुस्तकं वाचणं खूपच कमी झालंय.....पण एक काळ असा होता की मी वेड्यासारखी(का अधाशासारखी?) वाचायचे....नुसती वाचायचे नाही...त्यावर खूप विचार पण करायचे..त्या वेळची माझी डायरी माझ्या पुस्तक परीक्षणांनी भरलेली आहे......त्यातली काही इथे.....

कोसला....
१३-oct-२००१

आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली. कथेला काहीतरी चांगला शेवट किंवा काय म्हणतात ते..’कथाबीज’ असावं. आयुष्यभर काही न करता बापाच्या पैश्यावर मजा करणारा माणूस...ज्याच्या आयुष्यात फारसं महत्वाचं किंवा वेगळं काही घडत नाही अशा माणसाची..दररोजचे फालतु तपशील असलेली डायरी..काय वाचायची गोष्ट आहे?

खरंच ही असली पुस्तकं लोक का लिहीतात? आणि छापणारे का छापतात? त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला. उद्या माझी डायरी वाचून पण कोणी असाच निष्कर्ष काढेल का?

खरंच मला असं ब-याच वेळेला असं वाटतं की मी वेडेपणा आणि शहाणपणा यांच्या फार बारीक सीमारेषेवर आहे. जरा धक्का द्या..एका साईडला मी नक्कीच पडेन..आणि ते ही वेडेपणाच्या..असं मला नेहमी वाटतं. मी एकटी असताना कित्येक वेळेला असंबद्ध आणि वेडगळ, विकृत वाटतील असे काहीतरी विचार करत राह्ते.खरंच मला हे टाळण्यासाठी माणसांच्या संगतीत जास्त राहीलं पाहिजे..पण घडतं नेमकं उलटं!..मला पुस्तकं, टी.व्ही, कॉम्प्युटर यांचीच संगत जास्त आवडते. चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.

सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे, ज्याला चौफेर/चौकस म्हणतात तशी पण आहे मग माझे काही वेळेसचे असंबद्ध विचार हे असेच अतिबुद्धीमान लोकांचा वेडसरपणा या सदराखाली मोडत असतील का? बघा....मी जी पुस्तकं वाचते..तसे माझे विचार असतात आणि असं काहीतरी फालतू वाचलं आहे ना...मग आज माझे विचार पण तसेच असणार...ते सगळं खरडत बसण्यापेक्षा झोपावं हे बरं!!!