Sunday, November 25, 2007

माझ्या शौर्याच्या (??) सुरस कथा!!!!

१० नोव्हेंबर २००७

तशी काही मी शूर या सदरात मोडत नाही किंबहुना घाबरटच म्हणायला हवे. इतकी फ़िरले गेल्या एक-दिड वर्षात...माझ्या या सगळ्या प्रवासात अंधाराची भिती वाटते(आणि एकटेपणाची सुद्धा!!)...म्हणून माझ्या रुम मधले दिवे मी कधी बंद करत नाही....झोपतानासुद्धा...जास्त भिती वाटली तर टि.व्ही., रेडिओ हे पण रात्री झोपताना चालू ठेवते. आणि असे कधीतरी एकटे असताना नेमके नको ते प्रसंग आठवतात म्हणुन मी कधीही भुताखेताचे पिक्चर बघत नाही किंवा पुस्तके पण वाचत नाही...

मला प्रवास करणं ( तो पण विमानाने...आणि कंपनीच्या खर्चाने!!!) आवडायला लागलं आहे वाटतं. एक-दिड महिना होईल आता मी मागच्या वेळी सिंगापूर ला गेले होते त्याला....आणि मी परत ते सगळं मिस् करायला लागले आहे...ते विमानतळावरचे तास....ना इकडच्या जगात...ना तिकडच्या जगात...मध्येच कुठेतरी अधांतरी लोंबकळत असल्यासारखं...मला ते आवडायला लागलंय!!

या वेळी US हून परत येताना...सांता बार्बरा मधल्या अपार्टमेंट मधून निघून पुण्यात घरी पोचण्यासाठीच्या ४६ तास प्रवासात मी एकटीच होते. पण मी अगदी निवांत होते...फ़्लाइट मध्ये समोर आलेले सगळे खाणे पिणे व्यवस्थित केलं....काही तास झोपले...उरलेल्या वेळात फ़्लाइटमध्ये चालू असलेले सगळे हिन्दी, इंग्लिश पिक्चर बघून टाकले....हॉंगकॉंग एअरपोर्टवर ८ तासाच्या हाल्ट्मध्ये बराचसा एअरपोर्ट बघितला....मस्त विन्डो शॉपिंग केले.....एकूण काय....एकटी असताना पण प्रवास मस्त एंन्जॉय केला.

हेच पहिल्यांदा सिंगापूर ला जाताना मी प्रथमच एकटी प्रवास करत होते..म्हणजे प्रवास बराच केला होता तरी त्या आधीच्या सगळ्या प्रवासात माझ्यापेक्षा माहितगार कोणीतरी माझ्याबरोबर नेहमी होतं...सिंगापूर ला जाताना मात्र पुण्याहून पहाटे मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी मी जी निघणार होते...ते दुस-या दिवशी सकाळी सिंगापूर मध्ये हॉटेल लॉबीत ऑफिसमधले बाकीचे लोक भेटेपर्यंत मी एकटीच असणार होते.


आधी तर कामाच्या घाईत या गोष्टीवर विचार करायला वेळच मिळाला नव्हता. मुंबई एअरपोर्टवर माझा एक मित्र भेटायला येणार होता...त्याला मधूनच मी कुठपर्यंत पोचलेय हे कळवायला फोन करत होते त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवासात पण फारसं काही वाटलं नाही.एअरपोर्टवर मित्र भेटला..१०-१५ मिनिटे गप्पा झाल्यावर तो जेव्हा म्हटला..."चल गं..आता मी निघतो"......फट्कन साक्षात्कार झाला....अरेच्चा....आता इथून पुढे आपण अगदी पूर्ण एकटेच की!!! मित्राला म्हटलं..."खरं सांगू???....खूप भिती वाटायला लागलीये!!!"..तो खूप हसला...मला म्हटला..एवढी हुषार मुलगी आहेस...देवाने तोंड दिलेय......जिथे काही अडेल...तुला फ़क्त तोंड उघडून प्रश्न विचारायचे आहेत...आणि ते तुला आरामात जमेल...सगळं काही व्यवस्थित होईल...तेव्हा खरेतर त्याचा राग आला.......च्या मारी..मला भिती वाटतेय...आणि हा गधडा हसतो काय???..शेवटी त्याने विचारले "जाऊ का?"...त्याला जा सांगितलं..तसंही तो कितीही वेळ थांबला असता..तरी काय फरक पडणार होता?..तसंपण मला इतकी भिती का वाटतेय हे त्याला कळंत नव्हतं... तो गेला..आणि...प्रचंड टेन्शन येऊन माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं..आणि...रडायचं वगैरे नसताना डोळ्यात आपसूक पाणी यायला लागलंय....यामुळे मला माझाच संताप आला.

तडक रेस्टरूम गाठले...पहिले चेह-यावर पाणी मारलं....जरा अवतार ठीक केला....for god's sake....I should not look like a "radaki" girl...for such stupid reasons!!!.....बाहेर आले...पाणी प्यायले...आणि शांत बसले दोन मिनिट...मग डोकं थोडं चाललं....मुंबईत पण माझा फोन रोमिंगवर चालू होता..आणि मला किती आणि का भिती वाटते हे पक्कं माहित असलेल्या एका व्यक्तीशी तर मी नक्कीच बोलू शकणार होते.माझी बहिणाबाई!!!!!....मला खूप चांगलं ओळखते.मी न सांगता पण मला बरं वाटत नाहीये..किंवा भिती वाटतेय, काहीतरी बिनसलंय..हे तिला अचूक कळतं. माझ्या घाबरटपणा चा एक किस्सा तर तिने आख्ख्या खानदानाला सुनवलाय..


ही गोष्ट आहे मी तिसरीत असतानाची....आम्ही नुकतेच कोथरूड ला राहायला आलो होतो. जवळपासच्या दुकानात आम्ही दोघी मिळून थोड्याफार वेळेला गेलो होतो.तेव्हा अजूनपण मी काही काही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी...श्रीनिवासची एक पाटी वापरायचे. एक दिवशी संध्याकाळी घरातल्या पाटी वरच्या सगळ्या पेन्सिल संपल्या होत्या. दहा पैशाला एक पेन्सिल मिळायची. मी आईकडून वीस पैसे घेतले...आणि पाटीवरची पेन्सिल आणण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा आमचा रस्ता तसा कच्चा आणि बाजूलाच होता. रस्त्यावर भटके कुत्रे, डुकरे, शेळ्या मोकाट फिरत असायचे. मी आमच्या गेट मधून बाहेर पडले आणि कोप-यावरच्या पहिल्या दुकानाकडे निघाले. ब-यापैकी अंधार झाला होता. मी त्या दुकानापाशी पोचले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी गेट मधून बाहेर पडल्या पडल्या बाजूला उभी असलेली एक शेळी ( का बोकड होता?? शिंगे होती..त्याबरोबर कदाचित दाढी पण होती बहुतेक!) माझ्या बाजूनेच चालत चालत दुकानापर्यंत आली होती. मी पेन्सिल मागितली...तर नेमके त्याच्याकडच्या पेन्सिल्स संपल्या होत्या. मी दुस-या दुकानात जायचे म्हणून मागे वळले तर समोर ती शेळी!!!! तिने माझ्यावर शिंगे उगारली आहेत असं मला एकदम वाटलं आणि मी घाबरले. तरी पण आपलं लक्षच नाहीये असं दाखवत शेळीच्या डाव्या बाजूने जावे म्हणून मी थोडी डावीकडे वळले..तर शेळी पण तिकडेच वळली..मी उजवीकडे...शेळी पण उजवीकडे!!!.... तरी मी जोरात त्या दिशेने वळले..आणि रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेल्या एका दुकानाकडे जवळ जवळ पळत निघाले. पळता पळता मागे वळून बघितले तर...परत शेळी पण चालत त्याच दिशेने येताना दिसली. आता मात्र माझी खात्री झाली की ती शेळी माझा पाठलाग करत होती..आणि माझ्याजवळ पोचली की मला शिंगे मारणार होती. मी प्रचंड घाबरले आणि दुस-या दुकानाऎवजी घराच्या दिशेने जोरात जी पळत सुटले ते मागे न बघता...न थांबता थेट घरातच येऊन थांबले. पेन्सिल घेणे तर राहूनच गेले...आणि परत घरी पोचेपर्यंत मला रडू फुटले होते. पण आई..ताई..पप्पा कोणाला पण...शेळी पाठलाग करते ही गोष्ट पटलीच नाही...सगळे उलट मलाच हसले..आणि तेव्हा पासून ताई मला चिडवायचे झाले की माझ्यासमोर हा सगळा किस्सा नवनवीन लोकांना सांगत राहते. विक्रम..तिचा नवरा..आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना पण "निशा शेळीला घाबरते" हे तिने सांगून ठेवले आहे.

तर अशा माझ्या बहिणीला मग मी एअरपोर्टवरून फोन केला....जरी मी स्पष्ट काही सांगितले नाही तरी..घरून निघतानाचे...."काही काळजी करू नका..एकटी असले तरी मी नीट जाईन"...हे अवसान गेले होते...हे तिला समजले.तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. फ़्लाईट ११:३० ची होती. मग साधारण दर अर्ध्या तासाने...मी विमानात बसेपर्यंत ती मला फोन करत राहिली..आणि चहा घेतला का, कुठे बसली आहेस?...सामानाकडे लक्ष दे....असल्या फ़ुटकळ गप्पा मारत राहिली.मला का भिती वाटतेय हे निदान एका व्यक्तीला तरी समजल्यामुळे....आणि तसे पण....सिंगापूरपर्यंत विमानाने..आणि मग कॅब ने हॉटेलवर पोचेपर्यंत प्रवास नीट झल्याने मी सावरले झाले होते. हॉटेलच्या रूम वर पोचले...खाली जाऊन सिंगापूरच्या प्लग पॉइंट मध्ये लॅपटॉप चा चार्जर लावण्यासाठी कनव्हर्टर घेऊन आले. आणि पहिले घरी..आणि मग ताईला फोन करून मी नीट पोचल्याचे कळवले. ताईला फोनवर मी व्यवस्थित असल्याचे सांगितले..त्यावर ती हसून म्हटली..."शेळीला घाबरणारी मुलगी सिंगापूर ला एकटी गेली!!"

असो...एअरपोर्टवर माझ्या मित्राने दिलेला सल्ला खरेतर काही चुकीचा नव्हता...हे आता पटतंय..पण त्या वेळेला भिती वाटणं साहजिक आहे..हे त्याला समजलं नाही. आता मला परदेशप्रवासाचा भरपूर अनुभव आहे म्हणून ओळखीतले पहिल्यांदा प्रवास करणारे जेव्हा मला सल्ला विचारतात..तेव्हा मी माझ्या मित्राने मला सांगितलेली वाक्येच त्यांना ऐकवते.

पण...एका गोष्टीची मला कायम खात्री होती..आणि आहे...भले शिंगे मारण्यासाठी नसेल...माझ्याकडे तिला खाण्यायोग्य काहीतरी आहे असे वाटून असेल कदाचित...पण त्या शेळीने माझा पाठलाग केला होता हे नक्की!!!!!!

6 comments:

Vaishali Hinge said...

tujhyaa shauryaachee kathaa aavaDalee, mastay..
aani lahanpaanee kaahee aathavanee itakyaa pakkyaa manaat basalelyaa asataat naa tyaa kadheehi jaat naahee( aani ho aapanach tevhaa khare hoto he sudhaa :))

Vaidehi Bhave said...

tu lahanpani kashi disat hotis mahit nahi pan sheli eka lahan mulicha pathlag kartey he dolyasamor ubhe rahile..ani khup hasayla ale... :D hahaha

कोहम said...

athavani avadalya..

Anonymous said...

Gostei muito desse post e seu blog é muito interessante, vou passar por aqui sempre =) Depois dá uma passada lá no meu site, que é sobre o CresceNet, espero que goste. O endereço dele é http://www.provedorcrescenet.com . Um abraço.

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anudini By Praj said...

Hi Nisha...
I know u dont know me as such....
But i read u r blog .... n belive u put the ideas with gr8 Ingenuity....