Tuesday, April 22, 2008

असेन मी...नसेन मी.....

असेन मी...नसेन मी.....

८ एप्रिल २००८

परवाचीच गोष्ट आहे...माझ्या लंडनच्या फ़्लाइट्च्या ३६ तास आधी....रात्री मी अचानक जागी झाले..वाईट स्वप्न पडल्यामुळे!! तशी मला वाईट स्वप्नंच जास्त पडतात..अपघात, भूकंप (खूपच जास्त वेळेला), ज्वालामुखी, परग्रहावरच्या लोकांचा हल्ला, साप, विचित्र प्राणी....आणि अजून काय काय...यांनी माझी स्वप्ने भरलेली असतात. बरं हे सगळे..भितीदायक सिनेमे, सिरियल्स न पाहता, तसली पुस्तके अजिबात न वाचता बरं का( कधी तरी फ़ार फार पुर्वी थोडी पुस्तकं वाचली होती..आणि तसल्या सिनेमा, सिरीयलच्या जाहिराती चॅनेल्स बदलताना कधीतरी दिसणं अपरिहार्य आहे)...बघितले तर न जाणे काय होईल!!!!



तर........परवा रात्री..पहाटे जाग आली...वाईट स्वप्न....की माझे विमान बिल्डिंगला जाऊन धडकतेय...नेमके सांगायचे झाले तर......वर्ल्ड ट्रेड सेंटर पैकी दुस-या टॉवरला धडकलेल्या विमानात मी आहे अस मला दिसलं....खिडकीतून एक विमान धडकल्यामुळे पेटलेला, धूर निघणारा पहिला टॉवर दिसतोय..आणि आपण दुस-या टॉवरच्या दिशेने निघालेल्या विमान बसलो आहोत असं दिसलं.....मग जोरात धडक ....स्फोट....जबरदस्त हादरा....आग....सगळीकडे हल्लकल्लोळ, किंचाळण्याचे आवाज....सगलं काही दिसलं....ऐकू आलं......."जाणवलं"......पण स्वप्नात मी यातून वाचलेय...आणि पडलेल्या बिल्डिंगच्या ढिगा-यातून मदतीसाठी इकडे तिकडे दिशाहीन फिरतेय वगैरे वगैरे दिसलं....आणि मग मी दचकून जागी झाले.....बघितलं तर पहाटेचे ५-५.३० झाले होते....परत झोपच आली नाही!!......


विमान प्रवास ३६ तासावर आलेला असताना हे असलं स्वप्न??...ते पण माझ्यासारख्या भित्र्या मुलीला???.....बहुतांशी वेळेला अशी रात्री स्वप्नात पाहिलेली दॄष्यं दुपारपर्यंत मनात धुसर होऊन जातात. पण त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी खिडकीतून दिसणारा जळता टॉवर...आपलं विमान दुस-या वरच्या दिशेने चाललेय....हे दॄष्य मनातून जाईना...दुस-या दिवशी सकाळी ७ वाजता मी एअरपोर्टला जायला निघणार होते. बरं हे सांगावं कुणाला??(निदान अगदी ताजं ताजं असताना)....घरी कुणाला, अगदी ताईला जरी हे बोलले असते...तर त्यांनी मला जाऊच दिलं नसतं. दोन व्यक्ती आहेत...ज्यांना मी असल्या...मला भिती वाटतेय...अशा तद्दन मुर्खपणाच्या गोष्टी सांगू शकते...पण त्यात सुध्दा एका व्यक्तीचा फोन नंबर रिचेबल नव्हता...दुस-या व्यक्तीला माझ्याशी तेव्हा बोलायला वेळ नव्हता!!!


असली स्वप्नं मला नेहमीच पडतात...नवीन नाहीये....आणि त्यांचा सत्यस्थितीशी काही संबध नसतो..विमानप्रवासाबद्दलचे विचार आणि WTC बद्दल नुकतीच कधीतरी पाहिलेल्या डिस्कव्हरीवरच्या documentry मधली दॄष्यं एकत्र झाली होती इतकंच!..पण मग मनात नकळतपणे विचार सुरू झाला...पहाटे पहाटे पडलेले स्वप्न...खरं झालं तर???

समजा स्वप्न खरं झालं तर.....किती लोकांशी बोलायचं राहून जाईल....अजून जन्म पण न झालेल्या माझ्या भाचा/भाची ला एकदा पाहायचे पण राहून जाईल...हा विचार मनात आला...आणि रात्री पॅकींग होइतोवर कितीही उशीर झाला तरी काहीतरी कारण काढून ताई ला भेटून आले.....हंऽऽऽऽऽऽ.....वाईट विचार करणे एकदा सुरू झाले की त्यांना काही अंतच नसतो....तरी ज्या सगळ्य़ा लोकांशी एकदा बोलावं असं वाटलं त्या सगळ्य़ांशी बोलायला काही जमलं नाही.


अर्थात हे विचार मी लिहीतेय याचा अर्थ माझं विमान काही पडलं नाही हे सरळ आहे...पण तरीही या स्वप्नामुळे..मी लंडनपर्यंतचा प्रवास नेहमीसारखा एन्जॉय करू शकले नाही...ढगाळ आणि खराब हवेमुळे ९ तासापैकी ५ तास तरी सीट बेल्ट्स लावायचे सिग्नल्स चालूच होते....सारखा टर्ब्युलन्स होता....मध्ये एक दोनदा खूपच जास्त हेलकावे खाल्ले विमानाने...आणि माझ्या मनात विचार आला....झालं.....आता आपलं स्वप्न खरं होणार की काय????...पण नाही....पोचले बुवा लंडन ला एकदाची...आणि गेली दोन वर्षे सतत विमान प्रवास करणा-या आणि प्रवास आवडणा-या...खिडकीतून बघत बाहेरचं दॄष्य एन्जॉय करणार-या मला...पहिल्यांदाच विमानातून बाहेर पडल्यावर...हुश्य......झालं!.....

मग हॉटेलवर पोचल्यावर शांत बसले आणि विचार सुरू झाला....मी घाबरट आहे ( हे सांगायला मला लाज वाटत नाही, आहे तर आहे...शूरपणाचा आव आणून मनातून भेदरण्यापेक्षा हे बरे आहे)...मोठ्या घरात मी एकटी रात्री कधी राहात नाही...अंधारात जात नाही....पण खरंच मला नक्की कशाची भिती वाटते?.... मॄत्यूची???...पण त्याला भिऊन काय होणार?...तो तर एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे!...मग नक्की कशाची भिती??

मला वाटतं.....अंधाराला घाबरणारी माझ्यासारखी माणसं...खरंतर त्या अंधारातून अनपेक्षित असे काहीतरी बाहेर येईल, ज्याला सामोरे जायची आपली तयारी नसेल...या कल्पनेमुळे घाबरतात. आणि मॄत्यूपेक्षापण तो कसा होईल...आणि...मरणार हे कळल्या क्षणापासून प्रत्यक्षात त्या शेवटच्या क्षणापर्यंत जो काही काळ असेल...त्यात होणा-या मानसिक आणि शारिरीक यातनांच्या ते कल्पनेला घाबरतात. मला आठवतंय....माझी गाडी एकदा पावसाळ्यात (२००४ चा पावसाळा)वाईट्ट स्लीप झाली होती...तशी गाडीवरून स्लीप होणे किंवा दुस-या कुठल्या कारणाने मी त्याआधी अनेक वेळेला पडले होते...पण त्या प्रत्येक वेळी काय होतंय हे कळायच्या आत मी पडलेली असायचे....पण त्या वेळी मात्र गाडीचे मागचे चाक कशावरून तरी घसरतंय हे लक्षात येऊन...पायावर गाडीचे पूर्ण वजन घेऊन मी पडेपर्यंत सुमारे १० सेकंदाचा तरी काळ गेला.....पडण्यामुळे लागलेल्या मारापेक्षा पडेपर्यंत जे काय मनात विचार आले..रहदारीचा रस्ता..मागून येणारी बस....गाडीवर आपला काहीच ताबा नाही...भयानक!....तो प्रत्येक क्षण माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.....रस्त्यावर पाणी (पावसाचे किंवा दुसरे कशाचेही) दिसले की माझा २ व्हीलर चालवायचा confidence पुर्णपणे संपतो.....त्या पाण्यावरून गाडीचे चाक जायला लागले की मला परत तेच क्षण आठवतात आणि परत गाडी स्लीप होतेय असं वाटायला लागतं.. मग त्या पाण्यात ऑइल पडलेलं असो वा नसो. हे इतके वाढले की गाडी घसरल्याचा भास सारखा होणे...या साठी डॉक्टरचा सल्ला घ्यावा काय असा विचार मनात येऊन गेला....................असो....ते मी केलं नाही...पण लवकरात लवकर कार घ्यायची यामागे.. पाऊस पडत असताना २-व्हीलर चालवायची नाही..हा एक मोठा विचार होता!

राहता राहीली..या स्वप्नामुळे मला विमानप्रवासाची तात्कालिक भिती.......मला वाटतं यात...स्वत:ची, बरोबरच्या माणसांची स्वप्नं, अपेक्षा अर्धवट टाकून, डाव अर्ध्यावर सोडून जावे लागेल...मग या सगळ्या लोकांचे काय होईल...वगैरे हुरहूर होती.....

भा.रा.तांबेची एक कविता होती आम्हाला..नववी किंवा दहावी ला..... अगदी पटेल अशी...

जन पळभर म्हणतील हाय हाय.....
मी जाता राहील कार्य काय....


आपण गेल्यावर जवळातील जवळ व्यक्तींचे पण आयुष्य थांबणार नाहीये....आपल्या आधी हे जग चालू होतं...नवनवीन घटना घडत होत्या...आपल्या नंतरपण हे चक्र असेच चालू राहील...याची खंत आहे या कवितेत......

कविता तर खूपच छान आहे त्यात काही वादच नाही...तरी मला ही कविता नकारात्मक वाटते...शांता शेळकेंची याच आशयाची एक दुसरी कविता आवडते...


असेन मी..नसेन मी....
तरी असेल गीत हे...
फुलाफुलात येथल्या...
उद्या हसेल गीत हे.....



फ़क्त एवढीच आशा..(निशा ला आशा :))) ) आहे की खरंच जेव्हा या जगाला अलविदा करण्याची वेळ( किमान अजून ४०-४५ वर्षांनी!!!) येईल....मी शांता शेळकेंच्या कवितेतल्या सारख्या विचारात असावं...तांबेच्या कवितल्यासारख्या नव्हे....

-निशा.


7 comments:

xetropulsar said...

एव्हढं टेन्शन नाही घ्यायचं. . . काही होत नाही. . .मृत्यू यायचा तेव्हाच येणार. . .घरी गादीवर झोपलेलं असतानाही लोकांना हार्ट ऍटॅक येतो आणि तिकडे समुद्रात बोटीवरचे खलाशी प्रलयंकारी वादळाशी सामना करतात आणि स्वत: ला वाचवतात . .

राहता राहिली काय होईल याची भीती. . ही भीती घालवण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्या भीतीला सामोरे जाणे. . .हळूहळू आपोआप कमी होते

अमित

मोरपीस said...

आपण खरडलेल्या ऒळी फ़ार छान वाटतात मला. पण मला आपल्याला एकच सांगायचे आहे ते म्हणजे कुठल्याच गोष्टीच टेंशन घेऊ नका. हसा आणि हसवा.

Mess up in Thought said...

I remembered "KAJOL" from pyar to hona hi tha....She also portrayed the scaring girl @ flight journey.

you are the same...and your pics is also like Kajol...


keep smiling..

Vivek said...

शांताबाईंची कविता एक्दम छान. मी म्हणेन एक्दम brave ब्लोग आहे. मनातली भिती व्यक्त करायला पण daring लागतं :-)

असच बिनधास्त लिहीत रहा .....
आणि हो एक प्रयत्न करून बघ! रहस्य कथा वाच horror movies वगैरे पाहा कदचित भीतिदायक स्वप्न पडायची बंद होतील हा हा हा हा :-)

HAREKRISHNAJI said...

निशाजी,

बॉगचं टायटल आवडल हो.
आणखी बॉग लिहुन आम्हाला संधी द्या नं बोलायची
"फार बोअर करते बुवा ही मुलगी!"

Pravin said...

छान लिहिलय. आशा करतो की 40-45 वर्षांनी (किंबहुना त्याहून अधिक) तुमची इच्छा पूर्ण होवो आणि तोवर पडणारी स्वप्ने मनोरंजक असतील :)

Sachchidanand R. Swami said...

सत्याला सामोरे जा..जीवन सुंदर आहे.