Friday, July 26, 2013

उगाच चाललेले विचार!

आज कित्येक दिवस, महिने, वर्षांनी माझ्या या रडतखडत चाललेल्या (किंवा मरगळून गेलेल्या, जवळपास बंद पडलेल्या म्हणूयात ) ब्लॉगवर नवीन लिखाण का करावंस वाटलं बर मला?

जे माझ्या ब्लॉगच्या सुरूवातीला लिहिलंय तेच!.. "कोणी ऐकायला सापडले नाही, म्हणून लिहून ठेवलंय!"

आज ऑफिसमध्ये बसून मी चकाट्या पिटतेय, बरेच दिवस पूर्ण न झालेली झोप, फालतू कारणांनी सकाळपासून झालेली चिडचिड त्यामुळे आज विशेष काही भरीव काम माझ्या हातून होणार नाही हे तर माहित होतेच.

सुदैवाने मला अगदी प्रत्येक दिवसाचा, तासाचा हिशोब कोणी मागत नाही (तशी व्यवस्था आहे, त्यात मी तासांची नोंद पण करते) . पण जोवर हव्या असलेल्या वेळेत काम करून मिळतेय, ते सगळे व्यवस्थित चालतेय, त्या मध्ये फारसे कोणी पडत नाही.
माझे स्वतंत्र केबिन असल्यामुळे, आणि काही लोकांच्या (माझ्याबद्दल त्यांचे फार चांगले मत असल्यामुळे) ऑफिसमधील इंटरनेट वापराबद्दलाच्या माझ्यावर असलेल्या कॄपेमुळे मी एका कोप-यात बसून मॉनिटर वर कामाचे काही करतेय की अजून काही, कोणी विचारत नाही.

असो..नमनाला घडाभर तेल घालून झाले.

तर आज मी जे सगळे ब्लॉग्ज फॉलो करते, ते वाचून काढले, मी ज्या लोकांचे लेखन मराठी संस्थळांवर वाचत असते, आणि जे लोक मला संवेदनशील वाटतात त्यांचे वैयक्तिक ब्लॉग्ज पण शोधून वाचले. आणि ते लेखन, त्याचे विषय सोडून भलत्याच चिंतेने मला ग्रासले.

ह्यातील बरेचसे लोक, एकतर त्यांचे काही वैयेक्तिक/लौकिकार्थाने म्हणता येईल असे कुटुंब नाही किंवा असले तरी त्यांच्या बाकी सामाजिक गोष्टी मधील सहभाग/विचारांची पद्धत पचनी न पडल्याने विभक्त झालेले असे होते.

मग मी मला ज्यांचे एरवी लेखन आवडते, किंवा कोणत्याही क्षेत्रात महान कामगिरी मुळे आदरणीय असलेले लोक आठवले. बहुतांशी लोकांचे कौटुबिंक आयुष्य फारसे सुखकर नव्हतेच.

आता मला एक मुलगी आहे. अजून फारच लहान आहे. पण तिच्या वरती कुठले संस्कार व्हावे, तिने काय वाचन करावे. कशा प्रकारे एक चांगली, प्रगल्भ व्यक्ती होण्यासाठी तिच्या विचारांची दिशा असावी याबद्दल मी खूप विचार करत असते.

मग लक्षात आले, मला ती ज्या प्रकारी चांगली/प्रगल्भ/विचारी वगैरे व्हावी असे वाटते तशा प्रकारचे लोक मग महान ध्येयाच्या मागे धावता धावता ब-याच वेळेला कौटुबिंक आयुष्यात दु:खी किंवा त्या सुखाला पारखे  होतात. कधी पूर्ण विचारांती अशा गोष्टींपासून ते लोक दूरपण राहतात.

मला माझ्या मुलीला अशा प्रकारचे खरेच बनवायचे आहे का? माझ्या उतारवयात ती समजा असे आयुष्य जगली तर मला ते बघून बरे वाटेल का? चांगली/प्रगल्भ/विचारी वगैरे झाली तर सरसकट असे होईलच असे नाही, पण स्वत:पुरता विचार करणारे किंवा चाकोरीतून जाणारे लोक लौकिकार्थाने नक्कीच परिपूर्ण आयुष्य जगताना दिसतात.

पण मग ती अशीच लाखो करोडो लोकांसारखी चाकोरीतून जगताना आणि  माझ्या सारखीच शिक्षण/नोकरी/लग्न/संसार करून सरते शेवटी "जस्ट अनादर मिडीऑकर पर्सन" झालेली बघून तरी मला समाधान मिळेल का?

मलाच नक्की माहित नाहीये!

अर्थात इथे मी तिला काय बनवू इच्छिते यानेच सगळे होणार नाहीये, शेवटी जशी ती मोठी होईल तिचे स्वत:चे व्यक्तिमत्व बनेल आणि ती तिचे मार्ग निवडेल हे माहित आहे.  पण.. शेवटी एक आई/पालक म्हणून आपण स्वप्नांचे इमले बांधतच राहतो.

फार प्रश्न पडतात बुवा मला, नको ते! आणि ते कुठेतरी खरडण्यापर्यंत माझे वेगळेपण/विचारीपण सिमित आहे बहुतेक! ( बाकी लाखो करोडो "जस्ट अनादर मिडीऑकर पर्सन" सारखे!)