Saturday, July 28, 2007

माझी अमेरिका वारी...दुस-यांदा!!!!

२७-जुलै-२००७
एकदा शब्दांशी खेळता येतं हे कळल्यापासून मला हा छंदच लागलाय, मनात येणारी प्रत्येक गोष्ट यमक जुळणार-या ओळीत पकडायचा प्रयत्न करायचा!!

कुठलातरी कवी चावला मला बहुतेक! :))))

ही गरम गरम.....ताजी ताजी कविता......माझे विचार....अमेरिकेबद्दलचे!!!!!



कोलंबसच्या या देशात
पोचलेय मी दुस-यांदा,
सगळ्यांनाच मोहवणा-या
अमेरिके मध्ये परत एकदा....

काय हवंय मला नक्की
मलाच कधी कधी कळत नाही,
माझ्या माणसांजवळ राहाणं कायम छान
कि हवं आहे पूर्ण स्वातंत्र्य अन् सुखसोयी....

प्रश्न पडतो मला हा नेहमी
आवडेल का मला इथेच थांबायला,
आयुष्य कसं छान चालेल
नसेल जागा कदाचित नाव ठेवायला....

जरी आवडला मला खूप
इथे मिळणारा स्वतंत्रपणा,
तरी माझ्या माणसांपासून दूर
मध्येच एकटेपणा लागतो बोचायला....

इथे फ़क्त प्रत्येकाला सवय
स्वत:पुरते पाहण्याची,
एकमेकांच्या खाजगी आयुष्यात
चुकून ही न डोकावण्याची....

मग मला आठवते
मागे राहिलेले माझे घर,
नसेल इथल्यासारखा रेखीव
पण ओळखीचा परिसर....

पाहते जेव्हा इथे कायम राहणारे
लोक माझ्या देशातले,
ना धड इथे पूर्ण रुजलेले
ना तिकडचे पण राहिलेले...

एकदा इथली सवय झाल्यानंतर
मग तिकडचं काहीच नाही आवडत,
हव्या असतात फ़क्त इथल्या चांगल्या गोष्टी
बाकी सगळं मात्र मन नाही स्वीकारत....

नाही पाहायची मला मुळीच
माझी अशी स्थिती झालेली,
स्वत: मनाने भारतीय राहिले तरी
पुढची पिढी अमेरिकन झालेली....

मग हरघडी त्याना पाहून
मनात आपल्या शंका येत राहणार,
बरोबर होता का इथं राहाण्याचा निर्णय
हि गोष्ट कायम खात राहणार....

एकदा या मोहात पडले तर
माहीत आहे पडेल नंतर संभ्रम,
अजून काही वर्षे राहावे की परतावे
हा तिढा सुटणार नाही कायम....

असू दे गर्दी, खड्डे अन् प्रदूषण
माझं पुणंच शेवटी खरं,
असू देत चार सुखसोयी कमी
पण माझ्या पुण्यात राहावं हेच बरं!!!!!!!!