Thursday, August 16, 2007

अमेरिकावारी २ - स्काय डायव्हिंग - अजून एक धाडस!!!!!

११ ऑगस्ट २००७


जसे मी दुस-यांदा इथे पोचले होते तेव्हापासूनच या वेळी स्काय डायव्हिंग कराययचं....करायचं...असा नुसता जप चालला होता पण खरंच चौकशी करून बुकींग काही होत नव्हतं. पाच वीक एन्ड्स तसेच गेल्यावर शेवटी म्हटलं...बास्स......या वीक एन्डला...."होऊन जाऊ दे!!!!".... जमतील तेवढे गडी जमवायचे...लोक उगाच जास्त हो..नाही करायला लागले तर आपलं आपण जायचं .........पण.....जायचंच!!.....

शेवटी मी, दिपक आणि विशाल...तीनच लोक फ़ायनल येणार असं ठरलं. बुधवारी वेबसाईट नीट बघितली. फोन नंबर घेऊन तिथे बुकिंग साठी मी फोन केला. क्रेडिट कार्ड चे डिटेल्स दिले. सगळी माहिती...सूचना झाल्यावर तिथली ती बया मला म्हटली पेमेंट तुम्ही इथं येऊन करू शकता पण बुकींग कॅन्सल करायचं असेल तर फक्त पुढच्या चोवीस तासात करता येईल. त्या नंतर कॅन्सल केलं किंवा त्या दिवशी आम्ही तिथं तोंडच दाखवलं नाही तर माणशी ५० डॉलर चा चार्ज ती त्या क्रेडिट कार्ड वर लावेल. अन मी बावळट सारखा कंपनी च्या क्रेडीट कार्ड ऎवजी माझ्या पर्सनल क्रेडीट कार्डचा नंबर तिला दिला होता. दिपक अन विशाल ला सांगितलं...बाबांनो....आता प्लॅन चेंज करू नका. न केलेल्या गोष्टीसाठी कंपनी पैसे देणार नाही आणि फुकट ५० डॉलरला फोडणी! दुस-या दिवशी.....२४ तास उलटून गेल्यावर मनात म्हटलं...चला...आता मागं फिरणं अशक्य....५० डॉलर फ़ुकट जाऊ नयेत म्हणून तरी जावंच लागेल...कितीही भिती वाटली तरी :))

बास्स...अन त्या क्षणापासून जेव्हा विचार करायला थोडा वेळ मिळाला...आत्तापर्यंत फोटो आणि व्हिडिओ मध्येच पाहिलेले विमानातून खाली कसं दिसतं ते सीन्स डोळ्यासमोर यायला लागले. मग बरोबरच Universal Studio आणि Disneyland च्या roller coaster राईड्सवर जे climax moment ला जीव घाबरा झाला होता...ते आठवायला लागलं. disneyland च्या milliboomer ride var ती trolly झूम्मदिशी खाली येताना...हवेत अधांतरी असताना कसं विचित्र वाटतं ते आठवून तर..स्वत:ला बळेच घाबरवायची हौस आपल्याला का आलीय असा प्रश्न पडायला लागला.विमानातून उडी मारताना आणि मारल्यावर कसं वाटेल याचा विचार करणं शेवटी प्रयत्नपूर्वक बंद केलं. आयुष्यात पहिल्यांदा...एखाद्या गोष्टीचा intentionally विचार "न करणे" मला चक्क जमलं.

शेवटी तो दिवस...शनिवार उजाडला.बरोबर एक वर्षापुर्वी ११ ऑगस्ट २००६.....मी माझ्या पहिल्या अमेरिका भेटीसाठी सांता बार्बराला पोचले होते. परदेशगमन, घरच्यांपासून दूर एकटी राहणे, विमानप्रवास....ब-याच गोष्टी पहिल्यांदा करत होते...it was like an adventure only!दुसऱ्या अमेरिका भेटीत ११ ऑगस्ट २००७, बरोबर एक वर्षाने अजून एक साहस करायला निघाले होते..sky diving..तसे काही खूप great नाही...पण करताना भिती वाटणार...हे साहजिक होते.

सकाळी सगळं आवरून कॅबने तिथे पोचता पोचता १०:१५ झाले. आमचे बुकिंग ११ चे होते so बराच वेळ होता. मी फोनवरून जिच्याशी बोलले होते त्या मुलीने आम्हाला २-३ फॉर्म्स भरायला दिले आणि एक व्हिडिओ लावून दिला.फॉर्म्समध्ये सगळीकडे आम्हाला सही करून मान्य करायचं होतं की हे सगळे आम्ही पुर्णपणे स्वत:च्या मर्जीने करतो आहोत, आम्हाला यात असलेले सगळे धोके माहीत आहेत. हे करताना अपघात होऊन आम्हाला कायमचे अपंगत्व किंवा मॄत्यू पण होऊ शकतो आणि हे लोक त्यासाठी जबाबदार नाहीत. स्काय डायव्हिंग करताना झालेले अपघात कोणत्याही इन्शुरन्सने कव्हर होत नाहीत....वगैरे वगैरे. हे असले सगळे मुद्दे वाचल्यावर "चला...गुपचुप परत जाऊ या" अशा हास्यास्पद कल्पनेचा दोन मिनिट साठी विचार करून आम्ही त्यावर सह्या केल्या.


आधीच्या एका राऊंडचे लोक खिदळत परत आले, त्यांना हसताना बघून जरा बरं वाटतंय न वाटतंय तोच तिथल्या एका जंपरने स्वत:ची ओळख करून दिली आणि तो सूट घालायला चला असं सांगितलं. अंगावर तो सूट आणि पुढच्या फेरीच्या विमानाचा टेक-ऑफ करतानाचा आवाज....ह्रुदयाचे ठोके परत जलद पडायला लागले.त्यांच्या कॅमेरामनने छोटीशी मुलाखत घेतली अन शेवटी मी आणि दिपक एकाच विमानात आपापल्या जंपर आणि कॅमेरामन बरोबर चढलो. दिपक खूप exite झाला होता किंबहुना माझ्यापेक्षा जास्त! विमान तसे यथातथाच होतं....सीट्स थोडी फाटली होती...मुळात तिथं कोणी आरामात बसावं याचा विचार करून ते बनवलं गेलंच नव्हतं...लोकांना वरती घेऊन जा आणि हवेत त्यांना उडी मारायला लावा...सरळ आणि जलद काम!!


विमान सुरू झालं....ठोके आणखी जलद.... जसं विमानने जमीन सोडली...विमानातून उडी मारताना कसं वाटेल...हा विचार थांबवण अशक्य झालं. विमान जमिनीला समांतर होतच नव्हतं...सारखं तिरपं वर वर चढत होतं. बाहेर पाहून अजून टेन्शन येत होतं. सारखं वाटत होतं...आपण मुर्ख आहोत का...भिती वाटत असताना आपण का हे करायला आलो? पण दुसरीकडे हा पण विचार होता..मी भारतात परत गेल्यावर असं काहितरी थ्रिलिंग कधीच करणार नाहीये...आणि वरती हवेत खरंखरं तरंगत असताना खाली बघायला कसं वाटतं हा अनुभव मला निदान एकदा तरी घ्यायचाच होता.


मध्ये एकदा त्या जंपर ने माझा सूट त्याच्या सूटशी जोडला...थोडा वेळ गेला आणि मग इतका वेळ माझ्यासमोर बसलेला कॅमेरामन उठला आणि आमच्या जंपर्सने आम्हाला विचारले...पहिले उडी कोण मारणार?...मी क्षणार्धात..मी मारणार असं सांगितलं...कारण एकच...माझ्या आधी दिपकला विमातून अक्षरश: पडताना पाहून मला जास्त टेन्शन आलं असतं. मी तो गॉगल चढवला. कॅमेरामन ने दरवाजा उघडला आणि माझ्या डोक्यात शब्दश: घंटी वाजली...येस्स...शेवटी तो क्षण येऊन ठेपलाय...दरवाजा उघडल्यावर १०५०० फ़ूटावरचं वारं लागलं..खाली छोटी छोटी शेतं आणि रस्ते दिसत होते. मी पुढे आणि तो जंपर मागे..असे आम्ही दारापाशी गेलो.त्याने मला मान वर कर, हात कसे ठेवायचे अशा किरकोळ सूचना आधीच दिल्या होत्या. त्या सगळ्यांची छोटीशी उजळणी करून त्याने मला उजवा गुढगा अगदी दाराशी टेकवायला सांगितला, मान वर..हात खांद्यापाशी...आठवत नाही की माझे डोळे बंद होते का उघडे...आणि....त्याने....say 1......2.....and threeeeeeeeeeeeeeeeeeeeee......असं म्हणून...स्वत:ला आणि मला विमानाबाहेर झोकून दिलं!!!!.......


मला वाटतं (म्हणजे नंतर व्हिडिओ पाहिल्यावर कळलं!) हवेत...दोन तीन वेळा कोलांट्या उड्या मारल्यावर आम्ही जमिनीकडे बघायला लागलो...आणि मला स्स्सेममम......disneyland च्या राईड वर जे वाटले होते तेचं वाटंलं...हवेत अधांतरी...trying to hold on to something but not getting any support...चेह-यावर जोरात वारं लागत होतं...आणि नेमका अंदाज नाही आला तरी ती खाली दिसणारी शेतं आणि आपल्यामधलं अंतर भर्रकन कमी होत चाललंय हे जाणवलं...शेतं थोडी मोठी दिसायला लागली...जो काय अनुभव येत होता तो मती गुंग करणारा होता हे नक्की!..मला वाटतं...माझ्या चेह-यावर भिती आणि आश्चर्य यांचा काहितरी मिश्रण झालं असावं पण हसत नव्हते. तितक्यात तो कॅमेरामन कुठूनतरी आमच्या आसपास आला आणि मला फोटोसाठी पोझ दे असा इशारा केला. तोपर्यंत माझे हात खांद्याजवळ्च होते. त्याच्या सांगण्यावरून मी हात पूर्ण हवेत पसरले आणि काय सांगू....मस्त वाटलं...इतका वेळ आपण पडतोय असं वाटत होतं...हात हवेत पसरल्यावर उडतोय असं वाटायला लागलं....आणि मी त्याला फोटो साठी स्माईल दिली..त्या कॅमेरामन माझं जे काय लक्ष विचलित केलं त्यामुळे माझ्या थ्रिल फिलींगने भिती वर मात केली आणि मला खरंच मजा यायला लागली (व्हिडीओ पाहिल्यावर कळलं...मी चांगली ओरडत होते की!!) आमचा खाली येण्याचा वेग...आणि आजूबाजूची हवा...आणि कदाचित अजून फ़ार लांब न गेलेले विमान, सगळ्यांचा मिळून खूप आवाज येत होता.


असं किती वेळ नक्की चालू होतं खरंच आठ्वत नाही...पण निदान ४०-४५ सेकंद तरी नक्कीच!उलटा पालटा होत तो कॅमेरामन परत एकदा जवळ आला...परत काही फोटो...आणि तो दूर गेला....आणि एक जबरदस्त झटका बसला....जे काय मी आधीचे ३०-३५ सेकंद हसत होते ते परत बंद झाले. त्या जंपर ने पॅराशुट उघडल्यामुळे बसलेला तो झटका होता..नंतर माझा...विशाल आणि दिपक चे व्हिडिओ पाहिल्यावर कळलं जंपर्स आणि कॅमेरामनचा पॅराशुट उघडण्याचा वेळी विशिष्ट संकेत होता. पॅराशूटला आणि त्या जंपरला मी ज्या बेल्टसमुळे जोडले होते,या झटक्यामुळे ते जबरदस्त काचायला लागले. पण जसं पॅराशूट उघडलं तसं एकदम आजूबाजूचे आवाज थांबले अन शांतता झाली फ़क्त पॅराशूट्च्या फडफडण्याचा आवाज काय तो येत होता. त्या जंपरने ते काचणारे बेल्ट्स थोडे सैल केले मग माझं आजूबाजूला लक्ष गेलं...and it was simply amazing........मी आजवर जेव्हा केव्हा विमानप्रवास केलाय...हट्टाने नेहमी खिडकीजवळचं सीट घेतलंय...कारण..विमान टेक-ऑफ आणि लॅंड होताना अन एरवीसुद्धा खिडकीतून दिसणारं दॄष्य मला फ़ार आवडतं. पण हे तर त्यापेक्षा सुंदर होतं..मुख्य म्हणजे मध्ये काच नव्हती. ते दॄष्य फ़क्त डोळ्यांना दिसत नव्हतं त्याचं पूर्ण वातावरण जाणवत होतं...(मी disneyland मध्ये घेतलेली soarin california राईड ह्या अनुभवाची सर्वात जवळ जाणारी कॉपी होती..जिथे हयासारखाच अनुभव visual stimulation ने देतात. मला स्वत:ला freefall पेक्षा हा हवेत पॅराशूटने तरंगण्याचा अनुभव जास्त आवडला.


थोड्या वेळाने दिपक चे पॅराशूट हेलकावत आमच्यापेक्षा लवकर खाली जाताना दिसले (नंतर कळलं पॅराशूट्ची दिशा ठरवणारे दोर त्याच्या जंपरने त्याच्या हातात दिले होते) पण मला जास्त हेलकावे न खाता हळूहळू खाली येणे जास्त आवडले. हवेत थोडा वेळ जास्त तरंगता आलं त्यामुळे!! जशी जमीन जवळ आली तसं पाय जमिनीला टेकवायचे ते मला सांगितलं..आणि त्यानंतर सुमारे दोन मिनिटांनी आम्ही शेवटी लॅंड झालो.

लॅंड झाल्यावर लगेच नाही कळलं तरी त्या सेंटर मधून बाहेर पडल्यावर मला काही वेळ इतकं गळून गेल्यासारखं झालं की असं वाटतं होतं बाकी काही करं नये..झोपावं आणि निदान २४ तास तरी उठू नये!
मला माहीत आहे...हे मी परत कधी करणार नाहीये...एकतर खूप महाग आहे...आणि पहिल्यांदा निदान मला नक्की माहीत नव्हतं की freefall होताना कसं वाटतं...आता माहीत आहे...त्यामुळे मी पहिल्यापासूनच जास्त घाबरलेली असेन...coz i will know what is coming....मी काय इतकी पण शूर नाही...सो......हा माझा स्काय डायव्हिंगचा पहिला आणि शेवटचा अनुभव....पण अजून ब-याच(म्हणजे लय लय बर का!!) वर्षांनी मी माझ्या नातवंडाना सांगेन...."खूप भिती वाटत असूनसुद्धा तुमच्या आजीने एकदा विमानातून उडी मारली...आहात कुठे????" :))))))
-निशा.
स्काय डाइव्ह व्हिडीओ : http://www.esnips.com/web/NishsHomeVideos