Wednesday, February 6, 2008

इडियट बॉक्स!!!!

२९ जानेवारी २००८


दररोज सकाळी ऑफिसला येताना आणि परत जाताना रेडिओ-मिर्ची ऐकत असते. गाण्याबरोबर त्या R.J. लोकांची बडबड आणि सर्व जाहिराती पण ऐकत राहणे क्रमप्राप्तच आहे. R.J. च्या बडबडीचे गु-हाळ तरी एकवेळ ठीक आहे पण काही जाहिराती फारच भयंकर असतात विशेषत: निरनिराळ्या टि.व्ही. चॅनेल्सवर नवीन सुरू होणा-या सिरीयल्सच्या जाहिराती!!


पहिली जाहिरात लागली......"सांस-ससुर के शादीकी सालगिरह ज्यादा मायने रखती है या मा-बाबा के घर पे सत्यनारायण पूजा......आप मेरी जगह होते तो आप क्या करते?"...करूण आवाजात प्रश्न येतो....मग अजून करूण आवाजात गाणे सुरू होते....."बाबुल का आंगन छूटे ना.."...आई गं........जाहिरातीतल्या प्रश्नावर मनात लगेच वात्रट उत्तर आलं..."दोन्ही गेले उडत....तू आपली नव-याबरोबर फिरायलाच जा कशी!!"....यावर हसून होत नाही तोच दुसरी सुरू...."ये मुकाबला नही जंग है...एक तरफ सिमी (आपली गिरेवालांची हो!) के मुंडे....तो दुसरी तरफ करन (तोच तो जोहरांचा!) की कुडीयॉं"...सिमी रांदेवू मध्ये (कॄपया स्पेलिंग विचारू नये) लोकांना पकवून थकली वाटतं...आणि करणकडे सध्या कोणी कॉफी प्यायला येत नसावे शिवाय KANK (कभी अलविदा ना कहना) ला लोकांनी फार लवकर अलविदा केल्यामुळे नवीन पिक्चर काढायला पैसेपण शिल्लक नसावेत...मग आणा आमने-सामने दोघांना...होऊन जाऊ दे...लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहुयातच!!!



टि.व्ही. इडियट बॉक्स या नावाला सार्थ ठरतोय...ज्याच्यासमोर सगळे इडियट्स भक्तिभावाने बसतात असा बॉक्स!..तमाम हिन्दी चॅनेल्सवर एकता कपूरच्या "के" मालिकांनी धुमाकूळ घातलाय नाहीतर रियॅलिटी(???) शोजनी!!!...आणि हे पुरेसे नसावे म्हणूनकी काय मराठी चॅनेल्सवर एकता कपूरच्या मराठी बहिणींनी काढलेल्या मालिका असतात.(खबरदार कोणी भलती सलती शंका घेतली तर! मला "गुणां"मुळे तिच्या बहिणी असं म्हणायचं होतं..सॉरी बरं का जितेंद्र!!) "वहिनीसाहेब" काय...."अधुरी एक कहाणी" काय...


हिन्दी असो वा मराठी, या सर्व मालिकांमध्ये काही गोष्टी समान असतात उदाहरणार्थ एक स्त्री पात्र अगदी पराकोटीची सत्शील..अगदी संत म्हणावी अशी चांगली असते...पण ती फार रंजलेली, गांजलेली असते...अगदी घरकामवाली बाई असावी अशी तिची अवस्था असते. आणि दुसरे एक स्त्री पात्र खलनायिका असते...अगदी जाम डेंजर बरं का...दररोज लग्नात नेसाव्यात तशा साड्या..डोळे दिपून जातील इतका भडक मेकअप!!! या खलनायिकेचे मागच्या जन्मी केलेल्या पुण्यामुळे असेल कदाचित..पण नशीब फार जोरावर असते. तिने केलेल्या सर्व कुकर्मांची जबाबदारी सत्शील नायिकेवर ढकलण्यात ती वारंवार यशस्वी ठरत असते. मग जेव्हा गेल्याजन्मीचा पुण्यसंचय संपायला लागतो..ती पकडली जाण्याची शक्यता वाढू लागते..तसे तिचे अचानक हॄद्यपरिवर्तन होते..ती एकदम संत होऊन जाते..भरजरी साड्या जाऊन त्या जागी सुती साड्या येतात...मग सत्शील नायिका या बदलामुळे तॄप्त तॄप्त होऊन विश्वासाने जेव्हा तिच्या खांद्यावर मान टाकते तेव्हा...खर्रर्रर्र...पुढच्या दॄष्यात खलनायिका छद्मी हसताना दिसते (कसं फसवलं या आविर्भावात!)..भाग इथेच संपतो. आणि हा नेमका आठवड्यातल्या शेवटच्या वारचा भाग असतो. मग तुम्ही शनिवार, रविवार आता बापड्या नायिकेचे काय होणार या चिंतेत घालवावा हा हेतु!!!


या मालिकेतल्या सर्व पात्रांचे एकच जिवितकर्तव्य असते ते म्हणजे एकमेकांच्या मार्गात जमतील तितक्या आणि जमतील तशा अडचणी निर्माण करता येतील ते पाहणे...पडणारा शेअरबाजार, डॉलरचा कमी होणारी किमंत, अमेरिकेतले मंदीचे सावट, पॄथ्वीचे तापमान, दिवसेंदिवस भयाण होणारा वाहतुकीचा प्रश्न असले इतर जगाला भेडसावणारे यत्किंश्चित प्रश्न त्यांना मुळीच सतावत नाहीत.


स्वत:च्या आयुष्यात इतके प्रश्न आधीच असताना टि.व्ही. वरच्या मालिकांमधल्या पात्रांच्या आयुष्याबद्दल इतका विचार करणारे लोक पाहिले की मला कीव येते. पण "विकतंय" म्हणूनच यात पैसा ओतणा-यांचे अजून असल्या मालिका काढायचं धाडस होतं हे सत्य आहे. देव जाणे या masses ची मानसिकता कधी बदलणार! पण मी मला स्वत:ला आणि माझ्या घरच्यांना पण या असल्या मालिकांची सवय लागू दिली नाही आणि कधी देणारही नाही!!!!!