Monday, May 7, 2007

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

हल्ली पुस्तकं वाचणं खूपच कमी झालंय.....पण एक काळ असा होता की मी वेड्यासारखी(का अधाशासारखी?) वाचायचे....नुसती वाचायचे नाही...त्यावर खूप विचार पण करायचे..त्या वेळची माझी डायरी माझ्या पुस्तक परीक्षणांनी भरलेली आहे......त्यातली काही इथे.....

कोसला....
१३-oct-२००१

आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली. कथेला काहीतरी चांगला शेवट किंवा काय म्हणतात ते..’कथाबीज’ असावं. आयुष्यभर काही न करता बापाच्या पैश्यावर मजा करणारा माणूस...ज्याच्या आयुष्यात फारसं महत्वाचं किंवा वेगळं काही घडत नाही अशा माणसाची..दररोजचे फालतु तपशील असलेली डायरी..काय वाचायची गोष्ट आहे?

खरंच ही असली पुस्तकं लोक का लिहीतात? आणि छापणारे का छापतात? त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला. उद्या माझी डायरी वाचून पण कोणी असाच निष्कर्ष काढेल का?

खरंच मला असं ब-याच वेळेला असं वाटतं की मी वेडेपणा आणि शहाणपणा यांच्या फार बारीक सीमारेषेवर आहे. जरा धक्का द्या..एका साईडला मी नक्कीच पडेन..आणि ते ही वेडेपणाच्या..असं मला नेहमी वाटतं. मी एकटी असताना कित्येक वेळेला असंबद्ध आणि वेडगळ, विकृत वाटतील असे काहीतरी विचार करत राह्ते.खरंच मला हे टाळण्यासाठी माणसांच्या संगतीत जास्त राहीलं पाहिजे..पण घडतं नेमकं उलटं!..मला पुस्तकं, टी.व्ही, कॉम्प्युटर यांचीच संगत जास्त आवडते. चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.

सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे, ज्याला चौफेर/चौकस म्हणतात तशी पण आहे मग माझे काही वेळेसचे असंबद्ध विचार हे असेच अतिबुद्धीमान लोकांचा वेडसरपणा या सदराखाली मोडत असतील का? बघा....मी जी पुस्तकं वाचते..तसे माझे विचार असतात आणि असं काहीतरी फालतू वाचलं आहे ना...मग आज माझे विचार पण तसेच असणार...ते सगळं खरडत बसण्यापेक्षा झोपावं हे बरं!!!

10 comments:

रोहित said...

निशा,

कागदावरच्या नोंदी संगणकावर उतरवण्याची कल्पना चांगली आहे. तुमच्या उपक्रमाला शुभेछ्छा.त्याबरोबरच सद्यकालीन काही वाचायला मिळालं तर अधिकच चांगलं.

शहाणपणा आणि वेडेपणा यात अगदी बारीक रेघ असते हे अगदी खरं. पण कधी कधी ती ओलांडून पलीकडे एक चक्कर टाकून यायला (परत येण्याचा विश्वास असेल तर) काहीच हरकत नाही ना? तुमची २००१ सालातली थोडासा वेगळा विचार करायची सवय अगदीच मोडली नसेल अशी आशा :)

निशा............ said...

रोहित.....खरंतर मी गंमत म्हणून माझ्या डायरीतले काही परिच्छेद इथे उतरवले होते...ते कोणी वाचेल...आणि त्याहूनही..त्यावर काही प्रतिक्रिया देईल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. मी ऑर्कुट वर पण फारशी सक्रिय नसते..स्क्रॅपबुकात काही नवीन आलय का ते पाहणे आणि कधीतरी फोटो अपलोड करणे...इतकंच मी करते! सो..तिथं माझ्या प्रोफाइलला भेट देणारे पण कमी असतात.मग...तिथल्या ब्लॉग लिंकवर कोणी भेट देईल (मी माझा ब्लॉग बघा असं सांगितल्याशिवाय!) ही माझ्या द्रूष्टीने दुर्मिळ शक्यता होती.....

असो...आपलं प्रोफाइल मला बघता येत नाहिये..

आणि...जसा मला वेळ मिळेल तसा..अजून काही..वाचनीय (आणि जास्त खाजगी नसलेले..थोडक्यात प्रकाशनीय.. [;)]) लिहीण्याचा (खरडण्याचा!) मानस आहे...

बघू....कसं जमतं ते!!!!

Traveler said...

चांगलं लिहीलयं ..

खरं सांगू या नेमाड्यांचा ( माफी मागून ) मला दहावी त फार राग आला होता.त्यांचं लिखाण फारच क्लिष्ट ( उगाच काहीही लिहीलेलं) असतं, असा माझा पक्का समज झाला. आणि तो समज नसून ते सत्य आहे याची प्रचिती मला पुढे लगेच आली.( कदाचित माझ्या सामान्य बुध्दीला ते समजत नसावं).

व.पुं. च्या कथा मला फार आवडतात, त्यांचं महोत्सव पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं आहे.

असंच तुम्ही जे वाचलत त्याचा review इथे दिलात तर ते सर्वांना उपयोगी ठरेल...

निशा............ said...

@आनंद माने,

आज जर मी परत तेच पुस्तक वाचलं...तर कदाचित मला आवडेल पण....कुणास ठाऊक? लिहीला आहे तो...२००१ मधला अभिप्राय आहे!!

आणि....हे पुस्तक उघडायच्या आधी "भालचंद्र नेमाडे"..असे कोणी लेखक आहेत..हे पण मला माहित नव्हतं. नंतर मी त्यांचं नाव ऎकलं...त्यांना बरेच पुरस्कार वगैरे मिळाले आहेत...हे कळलं...

त्या नंतर...मग त्यांचं "हारण" पण वाचलं...पण आई शप्प्थ...मला तेव्हा पण ते पुस्तक नाही आवडलं...अपूर्ण ठेवलंय....नाहीतर...मुळात लिहीलंच का? हे मला तेव्हाही नाही कळ्लं...

माझ्या बुद्धीची मर्यादा असेल कदाचित...पण मला त्यांची पुस्तकं काही फार आवडली नाहीत कधी!...

रोहित said...

निशा,

नेमाड्यांचा "बुद्धदर्शन" हा धडा होता मला वाटतं दहावीच्या पुस्तकात. तो कोसलातूनच होता. (मला याची खात्री नाहिये. तपासावं लागेल एकदा.) तो मी कितीही वेळा वाचला तरी माझं समाधान होत नसे. सगळी कादंबरी चांगली नसेलही कदाचित, पण त्यात काही काही पानं अशी येतात की त्यासाठी बाकीच्या शब्दांना माफ करावंसं वाटतं.

माझं प्रोफाइल सार्वजनिक नाहिये हे मला तुमची प्रतिक्रिया वाचून जाणवलं. :) सुधारणा केलेली आहे.

तुमच्या आयुष्यातही नवीन धडा चालू झालाय, तो कधीही संपू नये ही शुभेछ्छा.

ता.क.: श्री. आनंद माने यांची प्रतिक्रिया वाचून असं वाटतंय की मी ज्या धड्याचा उल्लेख केला त्याच धड्याबद्दल ते बोलतायत. :) मलाही तो धडा पूर्ण कळला असं नाही, पण यशोधरा आणि बुद्धांची वर्णनं मला खिळवून ठेवत असत.
पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना!

निशा............ said...

हं...नवीन धडा......कल्पनेतला मित्र प्रत्यक्षात भेटला.........इतकंच.....

जे नेहमी फ़क्त डायरीत लिहीलं....कोणाला फारसं सांगितलं नाही...ते सांगू शकेन...आणि ज्याला ते समजेल...अशी व्यक्ती भेटली अखेर!!...

माझ्या "चौघीजणी" वरचा पोस्ट वाचा....माझ्या कल्पनेतला मित्र...लॉरी...सापडेल तिथे तुम्हाला!...

moribund said...

बाई, नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत. आणि त्यांची कोसला कांदबरी ही सोठोत्तर मराठी कादंबरीमध्ये अव्वल गणली जाते. ती छान आहे यात वादच नाही. मात्र तुमच्या विचांर करण्याची पातळी संकुचित आहे. तुम्हाला अजूनही कांदबरी म्हणचे साचेबंद कथा वाटते. अशा कथा लहान मुलांसाठी ठिक असतात. परंतू मोठ्यांनी त्याची अपेक्षा करणे हा पोरकटपणा असतो. तुम्ही पुन्हा एकदा कांदबरी वाचा..........आणि हो तुम्हाला हे विचार पटणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जिथे कुठे राहत असाल, त्या भागातील नामवंत महाविद्यालय शोधा आणि तेथील मराठीच्या प्राध्यापकाला कोसलासंबंधी विचारा. धन्यवाद.

Anonymous said...

I have lived life just like in Nemade's novels.

Those (Kosla, Jarila, Jhunj) are milestones of our literature.

Your problem is not that you are stupid, but you just don't get it.

You do need to come out of your small pond to think (or atleast appreciate) big.

विवेक जाधवर said...

कोसला ही ’जगण्याची ’ कादंबरी आहे. माझ्या मते मराठी साहित्यातील ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. तुम्हाला या कादंबरीचे आकलन झालेले नसेल, तर ते प्रयत्नपूर्वक करण्याची गरज नाही. दृष्टी असली की कादंबरी आपोआप कळते. बाकी तुम्हाला व. पु. काळे किंवा अवचट यांच लिखाण नक्कीच आवडत असणार. प्रेरणादायी अशी मॅनेजमेंटवरची पुस्तके आवडत असणार. व्यवहार सांभाळत हिशेबी जगणार्‍या मध्यमवर्गीय वाचकाकडून याशिवाय काय अपेक्षा करणार? ईश्वर तुमचे व मराठी साहित्याचे रक्षण करो.

Unknown said...

Nisha aani all,

Mala tumhala sangavese watate ki aata ya sarya pratisadanantar ekada punha nidan ekhada tari parichhed wachach kosala madhun...aani post kara kay watate te...

Aasha aahe nakkich vegala anubhav asel...