Monday, June 16, 2008

काळ नावाचं औषध......

काळ नावाचं औषध......

२४ मे २००८

लोक म्हणतात काळ हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. जात्या काळाबरोबर सगळ्याच जखमा हळूहळू भरून येतात म्हणे. होतं का बुवा खरंच असं?

११-१२ वर्षापुर्वीची गोष्ट, माझी एक मैत्रिण होती आणि ते म्हणतात ना कोणाच्या तरी प्रभावाखाली येणं तसं माझं झालं होतं. I was much too impressed with her!...तशा बाकीच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या पण ही माझी खूपच आवडती मैत्रिण होती. आणि ती माझ्या बाकीच्या कुठल्याच मैत्रिणींना आवडायची नाही. शिष्ट आहे, स्वत:ला खूप ग्रेट समजते...वगैरे वगैरे.....आणि बाकीच्या मैत्रिणींशी माझं तिच्यावरून खूप वाजायचं, पण मी काही माझी मतं बदलत नव्हते. पुढच्या शिक्षणात तिच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या होणार, मग आत्तासारखा contact राहणार नाही या गोष्टीचं मला फार वाईट वाटत असे.

बरं, बाकीच्या मैत्रिणीशी हिच्यासाठी भांडण करूनसुद्धा तिचं आणि माझं फार काही छान होतं अशातला भाग नव्हता. आम्ही दोन-अडीच वर्षे एकत्र असू त्या पैकी निदान दिड वर्ष तरी आम्ही भांडणं, अबोला यात घालवला. सर्वात शेवटचं भांडण मला खूप अनपेक्षित होतं जेव्हा काहीच कारण न सांगता तिने माझ्याशी बोलणं बंद केलं. ते ज्युनिअर कॉलेजचं वर्ष संपलं, पुढच्या वर्षी दोघी वेगवेगळ्या कॉलेजला गेलो. जवळजवळ दिड वर्ष झालं होतं भांडणाला! मग अचानक एकदा परत भेट झाली. कदाचित अशा प्रकारे भांडणं हे बालिशपणा या सदरात मोडतं असं वाटून किंवा जिला कधीतरी सर्वात जवळची मैत्रिण म्हटलं तिच्याशी निगडीत शेवट शेवट च्या आठवणी कडवट असू नयेत असं वाटून का होईना पण अबोला सुटला. तरीपण माझ्या आणि कदाचित तिच्यापण मनातली अढी पूर्णपणे गेली नाही. काही वेळेला भेटलो आणि मग contact कमी होत गेला.....संपला.

७-८ वर्षांपुर्वी कधीतरी आम्ही शेवटचे भेटलो होतो. तेव्हा email, मोबाइल हे प्रकार इतके कॉमन नव्हते. सो घरचा पत्ता आणि नंबर सोडला तर माझ्याकडे तिचे काहीच contact details नव्हते. १०-१२ वर्षांपुर्वी सहा आकडी असलेले पुण्याचे फोन नंबर गेल्या काही वर्षात पहिल्यांदा सात आणि नंतर आठ आकडी झाले, त्यामुळे आजही माझ्या लक्षात असलेला सहा आकडी नंबर काहीच कामाचा नाही. दोन- अडीच वर्षांपुर्वी तिच्या घराजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात आम्ही सहज काहीतरी चौकशी करायला गेलो होतो. नंतर मी तिच्या बिल्डींगच्या पार्किंग मध्ये चक्कर मारून आले. मला माहीत असलेली तिची, तिच्या वडीलांची..कुठल्याच गाडीचा तिथे पत्ता नव्हता. अर्थात १०-१२ वर्षात तिने घर, गाडी बदललेलं असेल आणि मला तसंही की ही तशी लवकरच लग्न करेल हे मनात कुठेतरी माहीत होतं so तिचे आईवडील तिथे राहत असले तरी ती आता तिथे नसणारच हा माझा कयास होता. शिवाय आमचं शेवटचं भांडण तिच्या घरात तिच्या आई- वडीलांसमोर झालं होतं. त्यानंतर मी कधीच तिच्या घरी गेले नव्हते मग आता वरती जाऊन ती सध्या कुठे असते हे विचारणे मला प्रशस्त वाटलं नाही.

इंटरनेट हा प्रकार हाताला लागल्यापासून गेल्या ४-५ वर्षात, मला जेव्हा रिकामा वेळ मिळाला मी तिच्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला. नेट वरती एखाद्या माणसाला शोधण्याचे जे सगळे प्रकार उपलब्ध आहेत, मी सगळीकडे तिला शोधलं. याहू people search आणि अशा कित्येक ठिकाणी मी तिचे नाव शोधले. yahoo.com, hotmail.com, usa.net .... मला जे कुठले लोकप्रिय मेल सर्व्हर माहित होते त्यावर तिच्या नावाची सगळी combinations असलेल्या email addresses वर मी मेल टाकले. ऑर्कूट म्हणू नका.....अजून तसल्या साईट्स..अगदी गूगलवर सुद्धा तिच्या नावाचा मी सर्च केला. जेव्हा यातलं काहीच यशस्वी झालं नाही तेव्हा लग्न होऊन तिचं नाव बदललं असेल असं वाटून मी तिचा भाऊ, आमच्या त्या वेळेसच्या कॉमन मैत्रिणी शोधल्या. कशातूनच काही रीझल्टस आले नाहीत, आता अजून काय करावे असं वाटत असताना अचानक पणे मला तिच्या त्यावेळेसच्या एक जवळच्या मैत्रिणीचे प्रोफाइल ऑर्कुटवर अनपेक्षितपणे थोड्याच दिवसांपुर्वी सापडले.

तिला बाकीच्या सगळ्या चौकश्याबरोबर ही सध्या काय करते हे पण विचारलं, मला अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्यांचा अजूनही contact आहे. तिचं लग्नं झालं काही वर्षापुर्वीच....तिला एक मुलगा झालाय हे कळलं. ती पुण्यातच असते, सॉफ्टवेअर मध्येच आहे, T Systems मध्ये काम करते हे सांगितलं, तिचं लग्नानंतरचं नाव आणि तिचा ई मेल address पण दिला...योगायोग बघा....इथं ऑफिसपाशी रस्ता ओलांडल्यावर T systems चे ऑफ़िस आहे! अक्षरश: "जिसको ढूंढा गली गली..वो घर के पिछवाडे मिली" असं माझं झालं. मला "युरेका युरेका.." झालं....अगदी उत्साहात मी तिला लगेच "काय कशी आहेस..ओळखलंस का हे मी विचारत नाही..कारण तू ओळखशीलच याची मला खात्री आहे..तुझ्या उत्तराची वाट बघतेय" असा एक मेल टाकला...............................

दोन महिने होऊन गेला..अजून एका शब्दाने उत्तर नाही आलं....जो अबोला सुटला असं वाटलं होतं तो आहे तसाच आहे....हे कुठेतरी जाणवलं..आणि कुठून दुर्बुद्धी झाली आणि आपण या व्यक्तीचा इतका शोध घेतला असं झालं. अबोला सुटलाय फक्त संपर्क कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे नातं पुढे राहिलं नाही या गैरसमजात कायम राहिले असते तर किती बरं झालं असतं!!!!

आणि तिने तरी असं काय करावं, दोन ओळीचं उत्तर दिलं असतं तर काय बिघडलं असतं.. एकेकाळच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला? काय मी तिच्या घरी लगेच जेवायला जाणार होते की तिने तेव्हा केलेल्या सगळ्या उचापती तिच्या नव-याला जाऊन सांगणार होते?

आजही माझे ई-मेल आणि कितीतरी ठिकाणचे पासवर्डस मध्ये तिचं नाव, तिचा वाढदिवस, तिचा फोन नंबर, तिच्या पहिल्या गाडीचा नंबर यापैकी काही ना काहीतरी गुंफलेलं आहे, म्हणजे तसं एका प्रकारे पाहिलं तर आज १२-१३ वर्षानंतरसुद्धा माझा एक दिवस पण असा जात नाही की दोन क्षण तरी पासवर्ड टाइप करता करता मी तिचा विचार केला नाही.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आवडीनिवडी, आदर्श बदलत राहतात. मग त्यामध्ये बसणारी लोकं आपल्यासाठी स्टार असतात. सहसा हे दूरचे चमकणारे तारे असतात पण कधीतरी त्या लोकांशी नातं पण जोडलं जातं. मग काही वर्षांनी तुमच्या आवडीनिवडी, आदर्श बदलले, ती लोकं तेवढी ग्रेट वाटेनाशी झाली तरी वाटणारा जिव्हाळा तुटत नाही. तसंच हिच्या बाबतीत होतं. मी कशी असायला हवे, दिसायला हवे वगैरे वगैरे.. असं मला जे वाटायचं त्याचं प्रतिबिंब मला तेव्हा तिच्यात दिसायचं. नंतर माझ्या कल्पना बदलल्या, पण आज जर तिची आणि माझी मैत्री तशीच राहिली असती तर...जग इकडचं तिकडे झालं, प्रसंगी मला त्रास झाला तरी मला शक्य असलेल्या सर्व प्रकारानी मी तिला emotional backing किंवा इतर कुठलीही मदत केली असती याची मला खात्री आहे.

अशीच ह्याच सुमारास झालेली माझी दुसरी एक मैत्रिण.....त्याच सुमारास कसली...तिघी एकाच ज्युनिअर कॉलेजला एका वर्गात होतो ना! वरती जिच्या बद्दल सांगितलंय ती जिला अजिबात आवडायची नाही त्यातली एक जण! पण आमचे या वरून कधी वाद झाले नाहीत..खरं तर आमच्यात भांडण असं एकदाही झालंच नाही. एखादा माणूस आवडणे...आणि एखाद्या माणसाच्या सहवासात मन:शांती मिळणे ह्या तशा खूप वेगळ्या गोष्टी आहेत पण दोन्ही प्रकारची माणसं तुमच्या आयुष्यात तितकीच महत्वाची असतात. ती दुसरी मैत्रिण खूप आवडायची आणि हिच्या बरोबर असलं, हिच्याशी बोललं की माझं frustration कमी होत असे. वयाने आपल्या एवढीच असून ही इतकी समंजस, शांत कशी...असा मला प्रश्न पडत असे. शिवाय अभ्यासात पण खूप हुषार..छान गाणं म्हणायची. तिच्यामध्ये असं काहीतरी होतं की तिच्याशी बोललं की बरं वाटायचं त्यामुळे मी तिला माझी प्रत्येक गोष्ट सांगायचे. अगदी माझ्या latest crush पासून ते मला वाटणा-या inferiority complex पर्यंत आणि घरी झालेल्या भांडणांपासून (त्या वेळी माझं घरी मुळीच पटायचं नाही..आठवड्यातून एकदातरी वादावादी हमखास!!) ते माझ्या भविष्याबद्दलच्या स्वप्नांबद्दल!!

१२ वीत माझे १२ वाजले, पण ही मात्र छान मार्क मिळवून पास झाली, फ़्री सीट मिळवून मुंबईला engineering साठी गेली. ती मुंबईला गेली तरी आमचा संपर्क मुळीच कमी झाला नाही. कॉलेजला येता जाता मी कायम तिच्या घरी थांबायचे, ती असली किंवा नसली तरी काका-काकू, तिचा भाऊ यांच्याशी गप्पा मारायचे. पत्रे किंवा फोन जरी केला नाही तरी २-३ आठवड्यातून ती जेव्हा एकदा पुण्याला यायची तेव्हा माझी संध्याकाळची चक्कर ठरलेली असायची. शनिवार किंवा रविवार संध्याकाळी तिच्या कडे जायचं, तिच्या घरून बोलत बोलत कधी S.N.D.T. कॉलेजचा कॅम्पस, कधी नळ स्टॉप जवळचा बंगल्यांचा परीसर तर कधी सेनापती बापट रोड अशी दोन-तीन तासांची फ़ेरी पक्की असायची. मग तेव्हा मी तिला आमच्या त्याआधीच्या भेटीनंतर माझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या महत्वाच्या, बिनमहत्वाच्या गोष्टींचे update देत असे. तेव्हा मला कधी ही गोष्ट फारशी जरी जाणवली नाही तरी आता विचार केल्यावर वाटते की ती स्वत:बद्दल फार कमी बोलायची, मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांशिवाय क्वचितच तिने मला ती काय विचार करते, तिचे भविष्याबद्दलचे विचार अशा गोष्टी सांगितल्या. माझ्यासारख्या लोकांना आयुष्यातली आणि मनातली प्रत्येक गोष्ट सांगायची गरज पडते. पण तशी प्रत्येकालाच असतेच असे नाही हे जरी खरे असले तरी आपल्याला inside out ओळखणा-या माणसाबद्दल आपल्याला फारसं काही माहीतच नाही ही काही सुखावह कल्पना नाही.

तिची engineering ची ४ वर्षे संपली आणि ती पुण्यात परत आली ती सत्यम कॉम्प्युटर्स साठी कॅम्पस मधून select होऊनच! आम्ही त्याबद्दल अगदी पार्टी वगैरे पण करून झाली, पण तो सुमार होता २००१ चा...IT कंपन्या recession मुळे अडचणीत यायला सुरवात झाली होती. lay off, नवीन recruitments रद्द करणे हे प्रकार फार किती तरी ठिकाणी सुरू झाले होते. आता हिचे काय काय होणार असं म्हणत शेवटी सत्यम चे पत्र आले. कॅम्पस मधल्या लोकांना त्यांनी निवड रद्द झाली असे सांगितले नसले तरी joining date अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. मला वाटलं होतं किंबहुना मला खात्री होती की हिने थोडी फार खटपट केली की हिचे सत्यम नसले तरी दुस-या कुठल्या तरी चांगल्या कंपनीत नक्की काहीतरी होईल. पण ही तर खूपच निवांत होती. सत्यम कडून joining चे पत्र येईल अशी आशेने ती बाहेर कुठे फारसं try च करत नाहीये असं निदान मला वाटायला लागलं. त्यातच तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी लग्नासाठी स्थळे बघायला सुरूवात केली, ती त्या बाबतीतही मला okay वाटली . माझ्यासाठी हा पण धक्का होता. come on!!!.....just 21-22....मुलगा असो वा मुलगी...माणसाने आधी स्वत:ची काहीतरी ओळख निर्माण करावी मग दुस-या कोणाशी स्वत:चे आयुष्य जोडावे..असं माझं मत आहे. B.E. ची डिग्री असलेलली माझी एकमेव मैत्रिण....जिला छान करीअर करण्याचे चान्सेस माझ्यापेक्षा खूप जास्त होते ती मात्र या मताची नाही हे मला माहीतच नव्हतं. इतकी वर्षे एकत्र असून मला हे कधीच का जाणवलं नाही? पण म्हटलं ठीक आहे लग्नासाठी स्थळे शोधायला सुरूवात केली की काय लगेच ठरतंच असं नाही आणि ती सुद्धा मी नोकरी शोधतेय, सत्यम वर फक्त अवलंबून नाही असं म्हटली. त्या वेळी माझं NIIT संपून मी पण नोकरी शोधायला लागले होते. भेटींमधलं अंतर थोडं वाढलं होतं.

मला आठवतंय २४ मे २००२, Sinewave मध्ये मी select झाले आणि हे तिला सांगायला मी फोन केला, तेव्हा ती "मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे, भेटल्यावर बोलू" असं म्हटली. पण त्यानंतर लगेच तिच्याकडे जायला मला काही जमलं नाही आणि कामाचा पहिला आठवडा घाईत गेला. २ जून तिचा वाढदिवस म्हणून मी खास तिला भेटायला weekend ला गेले. तिथे तिने मला अजून एक धक्का दिला, "माझं लग्न ठरलंय आणि final बैठकीसाठी आम्ही आज त्यांच्याकडे जातो आहोत" वगैरे वगैरे...... I was not prepared for this!!!!!........माझा job मिळाल्याचा , तिथं कामाचा पहिला आठवडा कसा गेला वगैरे वगैरे किती बोलायचं होतं मला...सगळा उत्साह गेला. घरी गेले आणि बराच विचार केला, मग वाटलं वाईट वाटण्यात काय अर्थ आहे? हे कधीतरी होणारच होतं. इतकी वर्षे आपण बोलत राहीलो आता तिच्याकडे बोलायला असेल and its my turn now to play good listener!!!! मी माझ्याबद्दल ची बडबड बंद नाही पण बरीच कमी केली त्यापुढच्या भेटींमध्ये..पण खरं सांगायचं तर भेटी अशा फारशा झाल्याच नाहीत तिच्या आणि माझ्या, तिचं लग्न ठरल्यापासून होईपर्यन्त! एक दोन प्रसंग सोडले तर तिला बोलण्यासाठी कधी माझी गरजच पडली नाही, लग्नाच्या आधी नाही आणि लग्ना नंतर गेल्या सहा वर्षात पण नाही. लग्नाच्या आधी तिने मला सांगितलं, खास त्याच्या जवळच्या मित्रांशी ओळख करून देण्यासाठी त्याने तिला एकदा नेले होते, तसेच काहीतरी, कधीतरी ती पण त्याच्याशी "ही माझी Best Friend" अशी ओळख करून देईल अशी माझी अपेक्षा होती. पण तसे काही झाले नाही. साखरपुड्याच्या वेळी तिच्या बाकी ब-याच मैत्रिणींबरोबर एकदा नाममात्र ओळख करून दिली. मला पुर्वी वाटायचं ती स्वत:बद्दल बोलत नाही कारण तिला माझं बोलणं ऐकण्यात जास्ती रस आहे, पण आता वाटतं तसं नसावं बहुतेक....नाहीतरी आता मला अनुभव आलेला आहेच ना की माझ्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकणारे, "good listener" वाटणारे लोक माझं तेव्हाच आणि तितकंच ऐकतात जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो आणि समोरच्याला बोलू द्यायला त्यांची ना नसते. प्रत्यक्षात माझं बोलणं एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडून दिलेलं असतं. ती पण तशीच असावी बहुतेक!

सहा वर्षे.....सहा..........लग्नानंतर पुण्यात असून तिने एकदाही अजूनपर्यंत मला घरी बोलावलेलं नाही. तिच्या मुलीचे बारसे झाले, तिच्या दादाचे लग्न ठरले अशा गोष्टी तिच्या आईकडे मी येता जाता एखादी चक्कर टाकल्यावर कळल्या आहेत.

लग्न झालेय...पूर्ण जग बदलले आहे..adjust करायला लागत असेल ब-याच नवीन गोष्टींशी.....याचा "benifit of doubt" देऊन मी तरीही बराच contact ठेवला. तिचा मोबाइल नंबर घेतला, एक दोनदा तिच्या वाढदिवसाला, तिच्या मुलीच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला फोन केला. मी फोन केला तर अगदी पुर्वीसारखी बोलणार..पण स्वत:हून सहा वर्षात एकदा ही फोन करायला जमू नये? इतका बिझी होऊ शकतो माणूस? मी अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून तिचा email address घेतला फोन करून, तिला म्हटलं "बाई, तुला फोन करायला पण वेळ होत नाही, पण दिवसभर कॉम्प्युटर समोर असतेस....कधीतरी एखादी मेल कर"......मी तिला बरेच मेल पाठवले...माझे ब्लॉग्ज..माझे ट्रिप चे फोटो..काही "लिहीलेल्या" मेल्स......पण पहिल्या "hi" च्या मेल ला आलेला दोन ओळीचा रिप्लाय आणि त्यानंतर आलेला एक "forward"...मग परत सगळं बंद............ अजून किती आणि काय करायचं? लग्नानंतर आयुष्य बदलतं, वेळ मिळत नाही.....माझा या असल्या कारणांवर विश्वास नाही....ज्याला नातं टिकवायचंय....तो काहीही करून टिकवतो...ज्याला वेळ काढायचाय...तो कसाही काढतो...ज्याची मुळात इच्छाच नाही त्याच्याकडे पोतडी भरून कारणे असतात.

त्रास होतो...जेव्हा लोक काही नीट कारण न देता असं अनाकलनीय वागतात. गेली तोन वर्षे झाले, दररोज घरी जाताना लॉ कॉलेज रोड ने जाते. दररोज नळ स्टॉप च्या सिग्नल ला थांबते, बाजूला बघितलं की तिच्या आईचं घर दिसतं, कधी तरी काकू - काका, तिचा दादा...तिची वहिनी दिसते.....जखमेवर परत एक नवीन ओरखडा उठतो. आणि गोष्टी अशा का बदलल्या असा हताश पणे विचार करत मी गाडीचा वेग वाढवते.

असो....तसे तर मी पण हल्ली ठरवलंय आणि तसंच वागतेय ...जेव्हा तुमच्या एखादा भाग (शरीराचा असो वा मनाचा!) त्याचे काम करण्याच्या ऐवजी सदैव ठणकतच राहतो, कुठलंच औषध परीणाम करत नाही...तेव्हा ऑपरेशन करून तो भाग काढून टाकलेलाच बरा असतो. फक्त जखमा ब-या न होणे हा माझा (अव) गुण मला स्वत:ला माहीत आहे त्यामुळे ठणका बरा होता की भरून न येणारी जखम.... हे येणारा काळच सांगेल..... फ़क्त ठणका बरा होता हा निष्कर्ष कदाचित निघाला तरी....तोडून टाकलेला भाग परत जोडता येत नाही!

बहुदा माझ्या मनाला हिमोफेमिया झालाय........ शी शी शी....काय पण उपमा....... सायन्स ची असले म्हणून काय झालं.... "मनाचा होमोफेलिया"???? छे छे...कुठल्या तरी साहित्यिक उपमेचा विचार करायला पाहिजे.....हं......ही कशी वाटतेय....आम्ही अश्वत्थाम्याच्या वंशाचे.... अमरत्वाचे वरदानपण ज्यामुळे शाप वाटेल अशी चिरंतन जखम कपाळावर घेऊन फिरणारे!!!!.......